

Election Commission staff attacked
पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढलेला असताना, प्रभाग क्रमांक ५ मधून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खारघर येथे शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीदरम्यान निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सोमवारी (५ जानेवारी) खारघर येथे झालेल्या प्रचार रॅलीदरम्यान निवडणूक आयोगाच्या वतीने रॅलीचे चित्रीकरण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना काही कार्यकर्त्यांनी दमदाटी केली. यावेळी त्यांच्या हातातील कॅमेरा हिसकावून घेतल्याने झटापटीत कॅमेऱ्याची नासधूस झाली. या प्रकारात संबंधित कर्मचाऱ्यांना मारहाणही झाल्याचे समोर आले आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे का, यावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक प्रमुख प्रचार कार्यक्रमाचे चित्रीकरण केले जाते. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक ५ मधील शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार लीना गरड आणि अनिता भोसले यांच्या प्रचार रॅलीचे चित्रीकरण सुरू असताना हा प्रकार घडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रचार रॅली संपल्यानंतर कार्यकर्ते जेवणासाठी मंडपात गेले होते. मंडपात काय भोजन तयार करण्यात आले आहे, याची पाहणी निवडणूक कर्मचारी करत असताना चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याने मटणाच्या टोपाचे झाकण उघडले. याच कारणावरून काही कार्यकर्त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दमदाटी करत कॅमेरा हिसकावण्यात आला. या झटापटीत कॅमेऱ्याचे नुकसान झाले असून कर्मचाऱ्यांनाही मार लागल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर तब्बल दोन दिवस उलटूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर झालेला हा हल्ला केवळ वैयक्तिक स्वरूपाचा नसून, तो थेट निवडणूक यंत्रणेलाच आव्हान देणारा प्रकार असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन होणे अपेक्षित असताना, इतक्या गंभीर घटनेची अद्याप दखल न घेण्यात येणे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे प्रभाग क्रमांक ५ मधील राजकीय वातावरण अधिक तापले असून प्रचाराच्या पार्श्वभूमीवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आयोगाच्या कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत त्यांच्यावरच हल्ला होणे आणि त्यानंतरही कारवाईला विलंब होणे, हे लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
खारघर प्रभाग ५ मधील उमेदवार अनिता भोसले यांच्या प्रचार रॅली मध्ये आमचे कर्मचारी रॅली चे चित्रीकरण करत होते, त्या दरम्यान त्यांना दमदाटी करून मारहाण केली. कॅमेऱ्याचे नुकसान झाले आहे.
- ज्ञानेश्वर कुथवाड ( निवडणूक निर्णय अधिकारी खारघर )
आम्ही चित्रीकरण करत असताना माझी कॉलर पकडली आणि मला मारहाण केली तसेच माझ्या गळ्यातील कॅमेरा ओढला, त्यात कॅमेऱ्याचे नुकसान झाले आहे.
- कॅमेरामन सुजल