

उरण : राजकुमार भगत
उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील अतिश सदानंद कोळी या युवकाने आपल्या जीवाची बाजी लावत, चक्रीवादळात भरकटलेल्या दोन बोटींवरील 15 खलाशांना सुखरूपपणे करंजा येथे आणून त्यांचा जीव वाचवला. त्यामुळे तो त्या 15 खलाशांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरला आहे.
नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामुळे रायगडमधील मच्छीमारीसाठी गेलेल्या अनेक बोटींचा संपर्क तुटला होता. यामध्ये करंजा येथील मच्छिंद्र नाखवा यांच्या मालकीच्या ‘महागौरी’ आणि ‘नमो ज्ञानेश्वरी’ या दोन मच्छीमारी बोटींचाही समावेश होता. या दोन्ही बोटींची वायरलेस आणि जीपीएस यंत्रणा बंद पडली होती. बोटींवर असलेले 15 खलाशी आणि तांडेल कुठे आहेत, याची कोणतीही माहिती मिळत नव्हती.
बोट मालक मच्छिंद्र नाखवा यांनी कोस्टगार्डकडे तक्रार दाखल करण्यासह अनेक स्तरांवर शोध घेण्याचा प्रयत्न केला. बराच शोध घेऊनही फक्त मुंबईपासून आठ तासांच्या आत एकदा त्यांचे लोकेशन मिळाले होते, परंतु त्यानंतर संपर्क तुटला.या परिस्थितीत, बोट मालक मच्छिंद्र नाखवा यांनी करंजा येथील युवक अतिश सदानंद कोळी याला बोटींचा शोध घेण्यासाठी पाचारण केले. समुद्र खवळलेला असतानाही अतिश कोळी याने आपल्या जीवाची पर्वा न करता, भानुदास कोळी (बोट मॅनेजर) आणि तांडेल अशा चौघांसह करंजा येथून बचाव कार्यासाठी आपली बोट घेऊन प्रवास सुरू केला.
बोटींचे जीपीएस बंद असल्याने, अतिश आणि त्यांच्या साथीदारांनी मोबाईलच्या जीपीएसच्या मदतीने प्रवास केला. सुमारे आठ तासांनंतर ते लोकेशनच्या ठिकाणी पोहोचले, मात्र तिथे बोटी आढळल्या नाहीत. रात्रीच्या वेळी परतीचा विचार साथीदारांच्या मनात आला, पण अतिशने दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेण्याचा निर्धार केला आणि बोट तिथेच नांगरून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेतला असता, दोन्ही बोटी जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरावर दिसून आल्या. परंतु, त्यांची स्थिती अत्यंत बिकट होती. एका बोटीचा गेअर तुटला होता, तर दुसऱ्या बोटीचा पंप खराब झाला होता. यामुळे खलाशांनी दोन्ही बोटी वादळात एकमेकांना बांधून नांगरून ठेवल्या होत्या.
राजू सिंग, मनोज सरण, पंकज यादव, राजू गौतम, जगदीश, संतोष कुमार आणि अन्य 9 असे एकूण 15 खलाशी चार दिवस कोणतेही अन्न न शिजवता केवळ बिस्किटे आणि पाण्यावर होते. अतिशय घाबरलेल्या आणि आजारी अवस्थेत ते मदतीच्या प्रतीक्षेत होते. अतिशला पाहताच, आपला जीव वाचवण्यासाठी देवदूत आल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि ते निश्चिंत झाले.
आमच्या बोटी बिघडल्याने आम्ही चार दिवस वादळात बोटी नांगरून होतो. कधीही बोटी बुडण्याची भीती वाटत होती. कोणीतरी देवदूत येईल आणि वाचवेल असे वाटत होते. अतिशच्या रूपात एक देवदूतच आला आणि आम्हाला सुखरूप घेऊन आला. खरंच तो देवदूतच आहे! अतिश कोळी आणि त्यांच्या साथीदारांच्या या अतुलनीय धैर्यामुळे आणि माणुसकीमुळे 15 जणांना जीवदान मिळाले असून, संपूर्ण करंजा गावात त्यांचे कौतुक होत असे खलाशी संतोष कुमार याने सांगीतले.
अतिश आणि त्याच्या साथीदाराने या बंद पडलेल्या दोन्ही बोटींना दोरीच्या साहाय्याने आपल्या बोटीला बांधले आणि परतीचा खडतर प्रवास सुरू केला. वादळी समुद्रातून दोन बोटींना बांधून आणणे अत्यंत अवघड होते. अनेक अडचणी आल्या, दोरही तुटले, परंतु या सर्व संकटांवर मात करत 24 तासांचा प्रवास करून अतिश कोळीने दोन्ही बोटी आणि 15 खलाशांना सुखरूपपणे करंजा बंदरात आणले. तो खरंच देवदूत आहे!
समुद्र खवळलेला होता. परंतु 15 खलाशांचे जीव आपल्याला वाचवता येतील, या विचाराने आम्ही चार जण बोट घेऊन निघालो. सकाळी बोटी मिळाल्यावर खलाशी खूप घाबरले होते. चार दिवस वादळात असल्याने त्यांच्या पोटात काहीच अन्न नव्हते, फक्त बिस्किट आणि पाणी पीत होते. परत आणताना वादळ मोठे असल्याने 24 तास प्रवास करावा लागला आणि खूप अडचणी आल्या. मात्र, आम्ही करंजाला पोहोचल्यावर एक मोठे समाधान मिळाले.
अतिश कोळी (करंजा येथील मच्छिमार)