

नीती मेहेंदळे
काही प्राचीन नगरं आजही अस्तित्वात आहेत. त्यांचा मागोवा घेत गेलं तर लक्षात येतं की, आता त्यांच्या भौगोलिक सीमारेषा धूसर झाल्या आहेत किंवा अगदीच बदलून गेल्या आहेत. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांचा भाग असलेला आणि 1998 नंतर स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित झालेला वाशीम जिल्हा ही अशीच एक प्राचीनतेचा वारसा असलेली नगरी.
वाशिमचा सर्वात जुना संदर्भ मिळतो तो वत्सगुल्म नगरी असा. वाशीम ही प्राचीन काळात वाकाटक राजवंशाच्या वत्सगुल्म शाखेची राजधानी व वत्स ऋषींची तपोभूमी होती असे संदर्भ सापडतात. वाशीमचा प्राचीनेतर इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेचा थोडक्यात धांडोळा घ्यावा लागतो.
वत्सगुल्म शाखेची स्थापना राजा प्रवरसेन पहिला याचा दुसरा मुलगा सर्वसेन याने प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर केली. सामान्यतः असं मानलं जातं की, प्रवरसेन पहिला नंतर वाकाटक राजवंश चार शाखांमध्ये विभागला गेला. दोन शाखा ज्ञात आहेत आणि दोन अज्ञात आहेत. ज्ञात शाखा म्हणजे प्रवरपूर-नंदीवर्धन शाखा आणि वत्सगुल्म शाखा.
राजा सर्वसेनने महाराष्ट्रातील वत्सगुल्म, म्हणजेच सध्याचे वाशिम, येथे आपली राजधानी स्थापन केली. या शाखेचे राज्य असलेला प्रदेश सह्य पर्वतरांगा आणि गोदावरी नदीदरम्यान होता. त्या काळात अजिंठा येथील काही लेण्यांचं संरक्षण केलं असे संदर्भ शिलालेखांमध्ये उपलब्ध आहेत. या सर्वसेनाने (इ.स. 330-355) धर्ममहाराज ही पदवी धारण केली. त्याला प्राकृतमध्ये हरिविजय या ग्रंथाचे लेखक म्हणूनही ओळखलं जातं. नंतरच्या लेखकांनी प्रशंसा केलेले हे काम आज उपलब्ध नाही. त्याच्यानंतर त्याचा मुलगा विंध्यसेन राज्यसत्तेवर आला.
विंध्यसेन (355-400) हा विंध्यशक्ती दुसरा म्हणूनही ओळखला जात असे. त्याच्या कारकिर्दीच्या 37 व्या वर्षी नंदिकट (सध्या नांदेड)च्या उत्तर मार्गात वसलेल्या एका गावाचं अनुदान नोंदवणाऱ्या प्रसिद्ध वाशीम ताम्रपटावरून त्याची ओळख पटते. अनुदानाचा वंशावळ भाग संस्कृतमध्ये व औपचारिक भाग प्राकृतमध्ये लिहिलेला आहे. कोणत्याही वाकाटक शासकाने दिलेला हा पहिला ज्ञात भूदान आहे. त्यानेही धर्म महाराज ही पदवी धारण केली. त्याच्यानंतर त्याचा मुलगा प्रवरसेन दुसरा गादीवर आला. याची माहिती फक्त अजंठाच्या सोळाव्या गुंफेतील शिलालेखातून समजते.
या दुसऱ्या प्रवरसेनाच्या जागी त्याचा मुलगा देवसेन (450-475) गादीवर आला. त्याचे प्रशासन प्रत्यक्षात त्याचे मंत्री हस्तीभोज चालवत होते. याच्या कारकिर्दीत, त्याच्या एका सेवक स्वामीदेवाने 458-459 मध्ये वाशिमजवळ सुदर्शन नावाच्या तलावाचे खोदकाम केले असा एक संदर्भ आहे. प्रसिद्ध वाकाटक राजा हरिषेण (475-500) त्याचे वडील देवसेन यांच्या जागी आला. त्याच्या कालखंडात त्याने वास्तुकला, कला आणि संस्कृतीला राजाश्रय दिला होता. जागतिक वारसा स्मारक अजिंठा लेणी हे त्याच्या दानाचे जिवंत उदाहरण आहे. अजिंठाच्या दगडी कोरीव गुंफा क्रमांक 16 मध्ये असे म्हटले आहे की, त्याने उत्तरेकडील अवंती (माळवा), पूर्वेकडील कोसला (छत्तीसगड), कलिंग आणि आंध्र, पश्चिमेकडील लाट (मध्य व दक्षिण गुजरात) व त्रिकुट (नाशिक जिल्हा) दक्षिणेकडील कुंतल (दक्षिण महाराष्ट्र) जिंकले.
हरिषेणाचे मंत्री आणि हस्तीभोज यांचे पुत्र वराहदेव याने अजिंठाच्या 16 व्या गुंफेच्या दगडात विहार खोदण्यासाठी दान दिले. अजिंठाची तीन बौद्ध लेणी : दोन विहार - लेणी 16 आणि 17 आणि एक चैत्य लेणी - 19 हरिषेणाच्या कारकिर्दीत कोरीव काम करून चित्रकला आणि शिल्पांनी सजवण्यात आली. कला इतिहासकार वॉल्टर एम. स्पिंक यांच्या मते, 9,10,12,13 आणि 15अ गुंफा वगळता, अजंठाची सर्व दगडी कोरीव गुंफा या हरिषेणाच्या कारकिर्दीत बांधले गेल्या आहेत. यावरून वाकाटक हे कला, वास्तुकला आणि साहित्याचे संरक्षक होते असं म्हणायला हरकत नाही.
याशिवाय औरंगाबादच्या घटोत्कच लेण्यांमध्येसुद्धा वाकाटक राजा हरिषेण (राजा 475 - इ.स. 500) याच्या कारकिर्दीत त्याचा मंत्री वराहदेव याचा अजून एक शिलालेख सापडला आहे. या लेण्यांमध्ये तीन लेणी आहेत, त्यापैकी एक चैत्य आहे आणि दोन विहार आहेत. या लेण्या इ.स. 6 व्या शतकात खोदल्या गेल्या होत्या आणि त्या महायान धर्माच्या प्रभावाखाली होत्या. या लेखात वराहदेव अभिमानाने आपल्या हिंदू वारशाची पुष्टी करताना दिसतो. शिलालेखात दात्याच्या कुटुंबाची म्हणजेच वाशीमच्या वाकाटकांची एक लांब वंशावळ दिली आहे. वाशीमची प्राचीनता पटवून द्यायला हे पुरावे पुरेसे आहेत.
अजून एक त्यानंतरचा संदर्भ सापडतो तो 1596-97 मध्ये ऐन-ए-अकबरीमधील. त्यात बेरार प्रांताचा अहवाल आहे, अकोला जिल्ह्याचा मोठा भाग अकबराच्या सरकार किंवा नरनाळा या महसूल जिल्ह्यात समाविष्ट होता. आज त्यातले काही भूभाग आता बुलढाण्यात समाविष्ट आहेत, तर दुसरीकडे अकोलामध्ये. अकबराच्या बशीम या महसूल जिल्ह्यातील तीन परगण्यांचा समावेश आहे असे समजते. ते म्हणजे बाळापूर, शाहपूर आणि बशीम. अब्दुल फजल आपल्या इतिवृतात बशीमबद्दल लिहितो, बशीम ही एक स्थानिक हटकर वंश आहे, बहुतेक भाग गर्विष्ठ आणि अस्थिर, त्यांच्या सैन्यात 1000 घोडदळ आणि 5000 पायदळ असतात. तो पुढे म्हणतो की, धनगर असलेले हटकर राजपूत आहेत, जे खरे आहे.
वाशीम ही राजधानी असलेल्या वाकाटक राजवटीची स्थापना होण्यापूर्वी, हे ठिकाण धार्मिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे केंद्र होते आणि आजही त्यात काही जुनी मंदिरे आणि पद्मतीर्थासारखी तीर्थे आहेत जी लोक पूजनीय मानतात. पद्मतीर्थ हे वाशीम जिल्ह्यातील भगवान विष्णूने निर्माण केलेले एक प्राचीन व पवित्र तीर्थ मानलं जातं. त्या तीर्थक्षेत्राबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की वासुकी ऋषींनी प्रथम स्नान केल्यामुळे वाशीमला ‘वासुकी नगर’ म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी एक मोठं जलकुंड आहे. वाशिम शहराच्या पूर्व बाजूला पद्मतीर्थ हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे. अरुणावती नदी आणि तिच्या उपनद्या वाशीम जिल्ह्यात उगम पावतात.
खुद्द वाशीम गावात नदीसान्निध्य नसले तरी त्याच्या उत्तरेस अडाण आणि दक्षिणेस पैनगंगा नद्या वाहतात, त्याच वाशिमच्या जीवनवाहिन्या.वाशीम गावात मध्यमेश्वर हे प्राचीन देवस्थान आहे. मध्यमेश्वर मंदिराबद्दल वत्सगुल्म माहात्म्य या ग्रंथात असा उल्लेख करण्यात आला आहे. वत्सगुल्म माहात्म्यच्या अकराव्या अध्यायाच्या सारात म्हटले आहे : गावात असलेल्या चामुंडा देवी तीर्थाच्या उत्तरेस मध्यमेश्वर नावाचे शिवलिंग आहे. या लिंगाचे माहात्म्य सांगा म्हणून वासुकी राजाने विनंती केल्यावर वसिष्ठ मुनी म्हणाले, पूर्वी देवयुगात ग्रह, नक्षत्र व राशी यांचे लोकांत ज्ञान नसल्यामुळे लोकांना अडचण भासू लागली. तेव्हा ऋषी सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे गेले व आम्हाला कालज्ञान व्हावे असे म्हणू लागले. त्यांनी असे म्हटल्यावर ब्रह्मदेव हसून म्हणाले, वेदांग ज्योतिष पाहिले म्हणजे कालज्ञान होईल.
यावरून ऋषींनी वेदांग ज्ञान प्राप्त करून घेऊन नारदादी संहिता निर्माण केल्या. त्यातून उदयास्त, चंद्र सूर्याची ग्रहणे, यांचे ज्ञान दैवज्ञांना होऊ लागले. त्याचप्रमाणे देशांताराचे परिज्ञान व्हावे म्हणून लंकेपासून मेरुपर्यंत त्यांनी मध्यरेखा कल्पिली. त्यावरून भूगोल ज्ञान व ग्रहांचे गणित करता येऊ लागले. याचा अर्थ पूर्वी तसेच पूर्वीच्या काळातील लोकांना ग्रह, तारे याचे ज्ञान व्हावे याकरिता येथे वेधशाळा सुरू करण्यात आली होती. तेव्हा तेथे ऋषी-मुनी ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करीत होते. ही रेखा लंकापुरी, देवकन्या, कांची, श्वेतगौरी, पर्यली, तसेच वत्सगुल्म, उज्जयिनी पासून सुमेरूपर्यंत जाते. वत्सगुल्म हे त्या रेषेचे मध्य कल्पून त्या मध्यमावर मध्यमेश्वर नावाचे शिवलिंग स्थापन केले गेले.
या मंदिराचे बांधकाम वाकाटक काळात झालेले आहे. पण वाशीमची ग्रामदेवता म्हणजे चामुंडादेवी. पुराण कथेनुसार चामुंडा देवीने चंड-मुण्ड या राक्षसांचा वध येथे केल्याचा सांगितले जाते. या मंदिरात दहा फूट खोलीत चामुंडा मातेची स्वयंभू मूर्ती आहे. पुरातत्त्व उत्खननात मंदिर परिसरातून तीन मूर्ती मिळाल्या होत्या,ज्यामध्ये चामुंडा देवी, बालाजी व अजून एकभग्न मूर्ती सापडली होती. वाशीमचं बालाजी मंदिर पेशवेकालीन सरदार साबाजी भोसले यांचे कारंजा शहरातील सुभेदार भवानी कालू यांनी बांधलंय. दरवर्षी अश्विन महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते त्यावेळी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.