भाकरीच्या चंद्राची जन्मशताब्दी

Narayan Surve
नारायण सुर्वेpudhari photo
Published on
Updated on

डॉ. महेश केळुसकर

रोजच्या व्यवहारातील भाषेशी जुळणारी सोपी, सरळ भाषाशैली सुर्वे यांनी निर्माण केली. ही कविता श्रमिकांची सुख-दुःखं व्यक्त करते. पण, या सामाजिक स्तरातील भाषेची सर्रास उचल सुर्वे करतात असं नाही. व्यवहारातील भाषेशी कवितेचं कितीही जवळचं नातं असलं तरी कवितेची भाषा संपादित असते. केवळ साहित्यजन्य भाषेची कोंडी सुर्वे यांनी आपल्या भोवतीच्या सामाजिकस्तरातील संपादित भाषेचा आधार घेऊन फोडली.

दोन दिवस वाट पाहण्यात गेले

दोन दिवस दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता

किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला,

तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यात

जिंदगी बर्बाद झाली...

अशा भाकरीच्या चंद्राच्या कविता लिहिणाऱ्या नारायण सुर्वे यांचं जन्मशताब्दी वर्ष 15 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झालं. आम्हा कवी मंडळींमध्ये सुर्वे मास्तर म्हणून ते प्रसिद्ध होते. वैयक्तिक माझ्याशी सुर्वे मास्तर बऱ्याच वेळा मालवणी बोलीमध्ये बोलायचे. रस्त्याच्या कडेला सापडलेल्या या अनाथ मुलाला ज्यांनी घरी आणलं आणि सांभाळ केला त्या गिरणी कामगार असलेल्या गंगाराम सुर्वे यांच्या घरात मालवणीच बोलली जायची. त्यामुळे नारायण सुर्वे स्वतःला मालवणी माणूस म्हणून घ्यायचे. त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी मी फिरलो आणि काव्यवाचनही केलं.

Narayan Surve
Thane Kopri muddy roads issue : खोदकामामुळे चिखलात अडकलेलं कोपरीचं जीवन

परभणीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्यावेळी सुर्वे मास्तरांची निवड झाली, त्यावेळी महाराष्ट्रात 100हून अधिक ठिकाणी त्यांचे सत्कार झाले आणि त्यांना शाली मिळाल्या. त्यातली फक्त एक शाल त्यांनी स्वतःसाठी ठेवली. काही शाली आमच्यासारख्या त्यांच्याबरोबर फिरणाऱ्या कवींच्या अंगावर घातल्या आणि बाकीच्या रस्त्यावर झोपणाऱ्या गरीब माणसांना पांघरल्या.

सन 1962 मध्ये ‌‘ऐसा गा मी ब्रह्म‌’ हा सुर्वे यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. वास्तवाचं एवढं मर्मभेदी दर्शन मराठी माणसाला यापूर्वी कधी घडलं नव्हतं. कवी म्हणून महाराष्ट्राला नारायण सुर्वे यांचा परिचय होण्यापूर्वी त्यांच्या अनेक कविता आणि लोकगीतं शाहीर अमरशेख यांच्या तळपत्या वाणीतून शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या चुलीपर्यंत जाऊन पोहोचली होती. माझे विद्यापीठ या त्यांच्या काव्यसंग्रहामुळे एका वेगळ्याच विश्वाचा परिचय मराठी साहित्याला झाला. सुर्वे यांची स्वतःची जडणघडण कशी होत गेली आणि कडवट अनुभवांचं हलाहल पचवून त्यांनी आपली वाटचाल कशी केली याचाच तो आलेख आहे.

Narayan Surve
Vishwas Patil : एकच विद्यार्थी असला, तरी मराठी शाळा बंद पडू देऊ नका!

जाहीरनामा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यावर, वर्तमानकालीन क्रांतीगर्भ युगाच्या उदयाची घोषणाच सुर्वे यांनी केली आहे, असा समीक्षकांनी त्यांचा गौरव केला. सूर्ययुगाची सुरुवात करणारी त्यांची कविता विश्वमानवाच्या जाणिवेने थरथरणारी आणि मृत्युंजय क्रांतिगामी चैतन्याने ओथंबणारी अशी अम्लान कविता आहे. ती पीडित, शोषित व दलित माणूस समूहाच्या उत्थानाची, उद्धाराची युगकविता आहे आणि म्हणूनच सुर्वे यांची कविता ही खऱ्या अर्थाने लोककविता आहे.

यंत्राच्या काळजातला स्वर आणि कामगाराच्या उडणाऱ्या नाडीचे जागते ठोके यांचे घंटारव अंतरात निनादत राहावेत ही सुर्वे यांची आकांक्षा होती आणि या घंटानादांच्या नादवलयातून त्यांची कविता आकार घेत गेली. सुर्वे यांनी आपल्या काव्यात अनुभवाचं एक वेगळं जग निर्माण केलं आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी यालाच वेगळ्या प्रांताचे नितळ दर्शन असं म्हटलं आहे.

नेहरू गेले तेव्हाच्या गोष्टीतली शीण पेलणाऱ्या जगातली सुंद्री, खोलीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला, पैशाचं पाकीट मारणारा पोरगा, शब्दासाठी जिना मुश्कील आहे म्हणणारा शीगवाला, पोस्टर चिकटवणारी पोरं, इसल्या, हणम्या, लुंगीवाला, नालबंद इत्यादी व्यक्ती म्हणजे त्यांच्या वेगळ्या जगातल्या सच्चा भावविश्वाची लेणी आहेत. या वेगवेगळ्या व्यक्तींच्या भावना-व्यथा, आकांक्षा, अपेक्षा, सुख-दुःख आणिहे सर्व सोसून जगण्याची त्यांची जिद्द एक अननुभुत रूप घेऊन सुर्वेंच्या शब्दात लयीत साकार होतं आणि वाचकांच्या जाणिवेच्या कक्षा वाढवत या ठिकाणी त्यांच्या कवितेतील खरं सौंदर्य आणि सामर्थ्य जाणवतं. या जाणिवेत माणसांच्या एका नव्या जगाचं जीवन प्रतिबिंबित होताना तिच्यावरची सांप्रदायिक विचारप्रणालीची टरफलं गळून पडतात.

सुर्वे मास्तरांना चंद्र फारच प्रिय असावा. त्यांच्या अनेक कवितांमधून चंद्र डोकावतो. तो कधी पिंपळावर येऊन प्रिय व्यक्तींची याद देत असतो, तर कधी सत्य-शिव-श्रमसौंदर्याचा चंद्र बनून तो महाराष्ट्राच्या नीलांबरी झळकतांना दिसतो. कधी भाकरीचा चंद्र असतो, तर कधी गालावरचा. तो कधी सोनुला चंद्र बनून येतो, तर कधी परिश्रम प्रिय पूर्ण पुरुषाच्या रूपानं पौर्णिमेचा चंद्र बनतो. कधी तो टॉवरवरून कललेला असतो, तर कधी सिग्नल बनून जातो. शब्दांनी दिलेले चंद्र तर अनेकांच्या डोळ्यात खुपतात. कधी तो ढळतो, तर कधी मळून जातो. चंद्राबद्दल कवीला इतकी जवळीक वाटते की, त्याच्यासाठी चार हिताच्या गोष्टी कवी सांगतो. असा हा आवडणारा चंद्र या शतकात सर्वांनाच लाभला का? हा प्रश्न कवीला पडतो. तो म्हणतो - पण, कुणी सांगेल काय या शतकात चंद्र महागला होता...

सुर्वे जेव्हा लेखन करू लागले, त्या काळाचं आपण अवलोकन केलं, तर प्रकर्षानं एक गोष्ट जाणवते ती ही की, त्या काळातील मराठी कविता अतिशय आत्मनिष्ठ होती. स्वतःपुरती मर्यादित होती. काहींनी कवितेत नाद उचलून धरला, तर काहींनी लय. समाजापासून स्वतःला तोडून कवी स्वतःच्या आवर्तात गुरफटत चालले होते, त्यावेळी सुर्वे मानवांचा समूह घेऊन पुढे आले. त्यांच्या कवितेत चळवळ आली, मिरवणुका आल्या, मोर्चे आले. या साऱ्या गोष्टी व्यक्तीसह त्यांच्या जीवनाचं अपरिहार्य अंग होतं म्हणून त्या गोष्टींचं त्यांच्या कवितांत येणंही अपरिहार्य होतं. ते आलं नसतं तर ती वंचना झाली असती, स्वतःशी व वास्तवाशी. सुर्वे यांच्या या कृतीशीलतेवर सतत प्रहार होत आले, पण ते डगमगले नाहीत. सर्व प्रकारची टीका झेलत सुर्वे सामान्य माणसासाठी आणि पीडितांसाठी कविता लिहित राहिले.

रोजच्या व्यवहारातील भाषेशी जुळणारी सोपी सरळ भाषाशैली सुर्वे यांनी निर्माण केली. ही कविता श्रमिकांची सुख-दुःखं व्यक्त करते. पण, या सामाजिक स्तरातील भाषेची सर्रास उचल सुर्वे करतात असं नाही. व्यवहारातील भाषेशी कवितेचा कितीही जवळचं नातं असलं तरी कवितेची भाषा संपादित असते. केवळ साहित्यजन्य भाषेची कोंडी सुर्वे यांनी आपल्या भोवतीच्या सामाजिक स्तरातील संपादित भाषेचा आधार घेऊन फोडली. त्यामुळे त्यांच्या कवितेला स्वाभाविक दणकटपणा लाभला. कवी आणि वाचक यांचा दुरावा नष्ट होण्याला मदत झाली.

नारायण सुर्वे यांच्यातील कवी तळपत्या तलवारीचा पुरस्कार करत असला, लाल बांगेचा पाईक असला तरी जीवनाचा अर्थ जाणू इच्छित असल्याने त्याची कविता सर्वांगाने फुलून येते. जीवनात काही अपरिहार्य, अनिवार्य, अटळ आहे, जे घडणार, होणार त्याला मोडता कोण आणि कसा घालणार? मार्ग दोनच - एक, दाती तृण धरून शरणागत होणे आणि दुसरा, लढता लढता धारातीर्थी पडणे. कवीच्या दुःखाने दुसरा मार्ग पत्करला आहे. जीवनापासून दूर जावे तर पळून कुठे व कसे जावे? मग जीवनाला अर्थ तरी काय? त्यातूनच कवीला कोपऱ्यातील तलवारीकडे बोट दाखवावे लागते. त्यासाठी कवीची ऊठ अशी हाक आहे. या उठण्यात निर्बलतेचा नाश व उत्थानाची बैठक किंबहुना उत्थानाच्या बैठकीसह निर्बलतेचा नाश अशी ही मालिका आहे. सुर्वेंसारख्या लोककवीला हे अस्तित्वाचं भान अधिक जाणवावं यात काहीच नवल नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news