

Youth dies after being hit by unknown truck near Poladpur
पोलादपूर : धनराज गोपाळ
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महाड ते पोलादपूर दरम्यान महाड औद्योगिक वसाहतीतून रात्रपाळीची नोकरी करुन लिफ्ट मागून मोटारसायकलवरून परत येताना अज्ञात ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवर मागील बाजूस बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी धडक देऊन ट्रकचालक पसार झाला. यानंतर लोहारे येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन जखमी मोटारसायकलस्वाराची विचारपूस केली असता, त्याने मृत व्यक्ती परिचयाचा असल्याचे सांगितले. तो पोलादपूर आनंदनगर येथील वैभव रमेश पालकर असल्याची माहिती त्याने दिली.
लोहारे येथील ग्रामस्थांनी पोलादपूर शहरातील संबंधितांना कळविले असता, पोलादपूरमधील अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वैभव पालकर याचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह पाठविण्यात आला.
महाड औद्योगिक वसाहतीतील कामगारांना ने- आण करण्यासाठी एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे अनेक तरुणांचा नोकरीला जाताना अथवा परतताना अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
या घटनेची माहिती समजतात पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.