

मुरुड: मुरुड तालुक्यातील यशवंतनगर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या नशिबातील पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण गेल्या साडेचार दशकांनंतरही कायम आहे. सन १९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या माध्यमातून सुरू झालेली 'नांदगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना' वनखात्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे रद्द झाली.
तेव्हापासून तब्बल ४५ वर्षे उलटूनही येथील जनतेला कोणत्याही धरणाचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे दरवर्षी एप्रिल ते जून या कठीण काळात येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वनखात्याचा खोडा अन् लोकवर्गणी मातीत
तत्कालीन काळात वडघर-कसाब येथील परिसरातील नदीवर ५५ लाखांची (जी पुढे ७० लाखांची झाली) नांदगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेसाठी नांदगाव, मजगाव, विहुर, उसरोली आणि काशिद या पाच ग्रामपंचायतींनी मिळून १० टक्के म्हणजेच ७० हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा करून शासनाकडे भरली होती.
गावोगावी जलवाहिन्या टाकल्या गेल्या, पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या आणि नदीवर बंधाऱ्याचे कामही सुरू झाले होते. मात्र, मातीच्या बंधाऱ्यासाठी नजीकच्या डोंगरातून माती काढण्याचे काम सुरू होताच, ही जागा वनखात्याच्या अखत्यारीत असल्याचा दावा करत वन अधिकाऱ्यांनी काम बंद पाडले.
या समस्येवर तोडगा म्हणून वनखात्याला रेवदंडा येथील १० पट पर्यायी जमीन देण्याचे ठरले होते. बॅ. अंतुलेंनी केंद्रीय वनमंत्री कमलनाथ यांची भेट घेऊन प्रयत्नही केले,परंतु सरकार बदलले आणि योजना अधांतरी राहिली. त्यानंतर युती सरकारच्या काळात प्रकल्पाची किंमत ४ कोटी ५० लाखांवर गेली.
वाढीव लोकवर्गणी भरणे ग्रामपंचायतींच्या आवाक्याबाहेर असल्याने अखेर शासनाने ही योजना कायमची गुंडाळली आणि मुरुड येथील परिसर अभियंत्याचे कार्यालयही माणगाव येथे स्थलांतरित करण्यात आले.
नेत्यांचे उंबरठे झिजवले, पण आश्वासनांशिवाय काहीच नाही
गेल्या ४०-४५ वर्षांत येथील जनतेने अनेक मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदारांचे उंबरठे झिजवले. मात्र, कोणालाही जनतेची दया आली नाही. सध्या स्थानिक ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषद व अन्य योजनांच्या माध्यमातून विहिरी खोदून पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे. परंतु, मार्च-एप्रिल महिन्यापासून या विहिरी तळ गाठतात किंवा कोरड्या पडतात.
परिणामी, ग्रामस्थांना दोन दिवसांतून एकदा, तेही केवळ तास-दीड तास पाणी मिळते. अनेक नागरिकांना विहिरींचे पाणी विकत घ्यावे लागत असून, पिण्यासाठी बिसलेरी किंवा फिल्टर केलेल्या बाटलीबंद पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
पाऊस भरभरून, पण धरणांअभावी पाणी समुद्राला
मुरुड तालुक्यात दरवर्षी सरासरी अडीच हजार मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस पडतो. मात्र, हा पाऊस अडवण्यासाठी कोणतीही मोठी धरणे नसल्याने हे सर्व पाणी नजीकच्या समुद्रात वाहून जाते. रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष पै. वांगारे यांच्या काळात विहुर पाझर तलाव बांधण्यात आला, मात्र त्याला संरक्षक कुंपण आणि जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने ते पाणी पिण्यायोग्य नाही.
काही वर्षांपूर्वी वांद्रे-वेळास्ते परिसरातील नदीवर मोठे धरण बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या भातशेतीचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्याने तेही काम रखडले.
आश्वासनांचे नारळ फुटले, पण योजना व्यर्थ
काही काळापूर्वी खारआंबोली येथील धरणाचे पाणी पंचक्रोशीला देण्याच्या योजनेचे नारळ फोडण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे उद्घाटनेही झाली, परंतु सध्यातरी या सर्व घोषणा आणि कामे व्यर्थ ठरली आहेत.
जनतेला मूलभूत सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी स्थानिकांनी स्थापन केलेल्या 'पंचक्रोशी पायाभूत सुविधा मंडळाचे' सदस्यही आता प्रशासनाच्या या भूमिकेमुळे हताश झाले आहेत.आज ७ जून उजाडला तरी अद्याप मान्सूनची साहुल लागलेली नाही. त्यामुळे संतप्त आणि त्रस्त झालेली यशवंतनगर पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनता आता आकाशाकडे डोळे लावून केवळ पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहे.