

World Police and Fire Games 2025 Birmingham
पनवेल : अमेरिकेतील बर्मिंगहॅम, अलाबामा येथे झालेल्या ‘वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2025’ या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी भारताचे नाव गौरवाने उंचावले. त्यांनी बॉडी बिल्डिंग आणि मेन्स फिजिक या दोन प्रकारांमध्ये सुवर्ण पदक पटकावत नवी मुंबई, महाराष्ट्र पोलीस दल आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाची क्षण निर्माण केली.
बॉडी बिल्डिंग प्रकारात १७२ सेमी उंची गटात आणि मेन्स फिजिक प्रकारात त्यांनी हे सुवर्णपदक मिळवले. विविध ७६ देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत पुजारी यांनी अत्युच्च कौशल्य आणि शिस्तीचा प्रत्यय देत आपली कामगिरी साकारली.
या यशामागे मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज तब्बल सहा तास केलेला सराव महत्वाचा ठरला. आतापर्यंत सुभाष पुजारी यांनी १० आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली असून, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि तयारीदरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे शहराचे सह आयुक्त श्रीकांत पाठक, डायल ११२ नवी मुंबईच्या पोलीस अधीक्षक प्रीती टिपरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांच्या पत्नी रागिणी पुजारी, गॅम्प्रो ड्रिलिंग कंपनी (खालापूर)चे संचालक आनंद गुप्ता व विवेक गुप्ता, राइनोमाइट क्लिनिक अंधेरीचे डॉ. कनिष्क जैन व डॉ. असीम माथन, सुदर्शन खेडकर आणि ऋषी पेणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या गौरवपूर्ण यशाबद्दल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) निखिल गुप्ता, अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) श्रीकृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुजारी यांचे अभिनंदन केले आहे.
सुभाष पुजारी यांच्या या विजयामुळे पोलीस दलातील कर्तव्याबरोबरच क्रीडा आणि शरीरसौष्ठव क्षेत्रातही महाराष्ट्र पोलीसांची कर्तृत्वाची छाप जागतिक स्तरावर उमटली आहे.