Raigad News | पनवेलच्या शुभांगीचा अमेरिकेत डंका ! जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेत पटकावले कांस्यपदक
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात कार्यरत असलेल्या शुभांगी संतोष घुले यांनी अमेरिकेत भारताचा तिरंगा फडकावला आहे. अमेरिकेतील अल्बामा येथे झालेल्या ‘जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेत’ त्यांनी अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या ‘अल्टिमेट फायर फायटिंग चॅलेंज’ मध्ये कांस्यपदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
५० देशांच्या स्पर्धकांवर केली मात
ही २१ वी जागतिक स्पर्धा होती, ज्यात तब्बल ५० देशांतील सर्वोत्तम पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सहभाग घेतला होता. शारीरिक क्षमता, बचाव कार्याचे कौशल्य आणि निर्णय क्षमतेचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेत शुभांगी यांनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली. त्यांचे हे यश पनवेल महानगरपालिकेसाठी अत्यंत गौरवाचा क्षण ठरले आहे.
या शानदार यशाबद्दल पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी शुभांगी यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्यासह महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
राष्ट्रीय स्तरावरही सुवर्ण कामगिरी
शुभांगी यांची ही पहिलीच मोठी कामगिरी नाही. यापूर्वी दिल्लीत झालेल्या ‘ऑल इंडिया फायर सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीट’ मध्येही त्यांनी थाळीफेक आणि गोळाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्णपदके जिंकून राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले होते. अग्निशमन दलासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात काम करत क्रीडाक्षेत्रात त्यांनी मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
"या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबाचा आधार आणि महानगरपालिकेचा पाठिंबा आहे. यापुढेही अधिक मेहनत करून देशाचे नाव उंचावण्याचा माझा प्रयत्न राहील."
- शुभांगी संतोष घुले

