

Poor Road Construction in Panvel Municipal Corporation
पनवेल : नवीन पनवेलमधील एचडीएफसी सर्कलजवळ बुधवारी (दि.२१) सकाळी एक गंभीर आणि लाजिरवाणी घटना घडली. एक मालवाहू ट्रक थेट नवीन केलेल्या रस्त्यातच रुतला. ट्रकच्या मागील आणि समोरील चाकं डांबरी रस्त्याच्या थरात घुसली. त्यामुळे ट्रक अडकून पडला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
अलीकडेच पनवेल महानगरपालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करत शहरातील विविध रस्त्यांचे नूतनीकरण केले. एचडीएफसी सर्कलजवळील हा रस्ता त्याच योजनेचा एक भाग होता. डांबरीकरणाचे काम पनवेल मधील पीडीआयपीएल या नामांकित कंपनीला दिले होते. काही दिवसा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पण इतक्या कमी कालावधीत या रस्त्याची दुर्दशा समोर आली आहे.
दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा ट्रक एचडीएफसी सर्कलजवळून जात असताना अचानक रस्त्याचा एक भाग खचला आणि ट्रकच्या दोन्ही बाजूंची चाके रस्त्यात खोलवर रूतली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक तासाभराहून अधिक काळ अडकून राहिला. आणि वाहतूक कोंडी झाली. स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांनी याची माहिती महानगरपालिकेला दिली असली, तरी घटनास्थळी कुठलाही अधिकारी वेळेत दाखल झालेला नव्हता. नागरिकांनी ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण विशेष यंत्रसामग्रीशिवाय ते शक्य झाले नाही.
"डांबर घालायचं नाव घेतलं आणि वर एक थर मारून पालिकेने काम उरकलंय. यात केवळ पैसे खाल्ले गेलेत, पण कामाचा ठणठणीत दाखला या रुतलेल्या चाकांनीच दिलाय," अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी राजू पाटील यांनी दिली.
दुसरीकडे, महानगरपालिकेचे ठेकेदार या संपूर्ण प्रकरणात गप्प बसले असून, अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. हे रस्ते काम पूर्ण करताना कोणत्या दर्जाची सामग्री वापरण्यात आली याचा तपशील लोकांना मिळालेला नाही.
या प्रकरणामुळे पनवेल महापालिकेच्या रस्ते विकास योजनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोट्यवधी रुपयांच्या निधीचा वापर करून जर रस्ते काही दिवसांतच खचत असतील, तर सार्वजनिक पैशांचा अपव्यय आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नगरसेवकांनीही याची गंभीर दखल घेतली असून, संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी महानगरपालिकेकडे होऊ लागली आहे. नागरिकांनी देखील लेखी तक्रार देण्याचे संकेत दिले आहेत. सध्या तरी हा रस्ता वाहतुकीसाठी उघडा आहे, पण भविष्यात याच रस्त्यावरून एखादी जीवघेणी दुर्घटना घडू नये. म्हणून यंत्रणांनी वेळेत धडे घेतले पाहिजेत. अन्यथा लोकांचा संयम सुटायला वेळ लागणार नाही, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.