Palghar Agriculture : पोषक हवामानाअभावी शेतकरी संभ्रमात

विक्रमगडमध्‍ये थंडी गायब झाल्याने भाजीपाला उत्पादनाची चिंता
Palghar Agriculture
Palghar Agriculturepudhari photo
Published on: 
Updated on: 

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील पिकांसह विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली जाते. मात्र, यंदा पावसाने लवकर परतीचा मार्ग धरल्याने शेतातील जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. परिणामी, पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत आला असून काहींना अपेक्षित पिके घेणेही शक्य झालेले नाही.

अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल अथवा अन्य सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, ते शेतकरी आता भाजीपाला लागवडीकडे वळू लागले आहेत. मात्र, नोव्हेंबर महिना सुरू होऊनही अपेक्षित थंडी पडत नसल्याने भाजीपाला पिकांच्या वाढीबाबत आणि उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे.

Palghar Agriculture
Kotwal Recruitment : राज्यातील कोतवाल भरतीला ब्रेक

साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून वातावरणात गारवा चांगल्या प्रकारे वाढू लागतो. पहाटे पडणारे धुके, थंड हवा आणि दिवसा असणारे पोषक तापमान यामुळे अनेक भाजीपाला पिकांना चांगले वातावरण मिळते. त्यामुळे या काळात विक्रमगड तालुक्यातील शेतकरी वांगी, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, भेंडी, वाल, पालेभाज्या आदी पिकांची लागवड करतात. स्थानिक बाजारपेठेसह आसपासच्या बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याला मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांसाठी हा हंगाम आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार ठरतो.

या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही अपेक्षित थंडीचा अभाव जाणवत आहे. पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा आणि धुक्याचे प्रमाण कमी असून दिवसा कडक ऊन पडत असल्याने वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांच्या वाढीवर होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. भाजीपाला पिकांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण मिळत नसल्याने लागवड करावी की आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Palghar Agriculture
Mahad News : अखेर बेपत्ता ग्रामसेवकाचा आढळला मृतदेह

विक्रमगड तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात

शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी बियाणे, रोपे, खते, औषधे, मजुरी आणि पाण्याच्या व्यवस्थापनावर मोठा खर्च करावा लागतो. अशा वेळी हवामानाने साथ दिली नाही तर उत्पादनावर परिणाम होण्याबरोबरच आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. आधीच पावसाच्या लवकर परतीमुळे रब्बी हंगामाला फटका बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून भाजीपाला लागवड करण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत.

एकीकडे पावसाअभावी रब्बी हंगाम अडचणीत, तर दुसरीकडे थंडीच्या अभावामुळे भाजीपाला पिकांच्या उत्पादनाची अनिश्चितता, अशा दुहेरी संकटात विक्रमगड तालुक्यातील शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे यंदाचा भाजीपाला हंगाम तरी चांगला जावा आणि हवामानाने साथ द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.