

महाड : महाड पंचायत समिती येथे कामानिमित्त आलेले आणि गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले ग्रामसेवक गजानन विठ्ठल गाढवे (वय ३५, मूळ रा. भोसा, ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांचा मृतदेह सोमवार ९ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील दहिवड गावच्या पश्चिमेकडील जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गाढवे यांच्या बेपत्ता होण्याप्रकरणी भावाने महाड शहर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृतदेह आढळल्याने महाड परिसरात खळबळ उडाली आहे.
गजानन गाढवे हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सध्या ते महाडमधील शिरगाव येथे महेश जाधव यांच्या घरी वास्तव्यास होते. ५ नोव्हेंबर रोजी ते पंचायत समिती महाड येथे कामानिमित्त गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी तसेच परिचितांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला. परंतु त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर त्यांचे भाऊ विलास विठ्ठल गाढवे यांनी ८ नोव्हेंबर रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गजानन यांना पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गजानन यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक आणि अन्य ग्रामसेवक प्रयत्न करीत होते. याचदरम्यान सोमवार ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दहिवड गावच्या पश्चिमेकडील जंगल परिसरात त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पोलिसांच्या अहवालातील प्राथमिक माहितीनुसार, मद्यप्राशन केल्यानंतर नशेच्या अवस्थेत त्यांनी एखादे कीटकनाशक प्राशन केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राठोड पुढील तपास करीत आहेत.