

Minesh Gadgil Vietnam Green Rice
जयंत धुळप
रायगड: आजवर आपल्या शेतात ब्लॅक बर्मा, लाल,नीळा,जांभळा अशा प्रकारच्या पिग्मेंटेड राईसची यशस्वी लागवड करुन पिक घेतलेले गुळसुंदा येथील शासनाचा कृषीभुषण पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी मीनेश गाडगीळ यांनी यंदा प्रथमच व्हिटेनम व्हरायटीचा ग्रीन राईसची लागवड आपल्या शेतात केली असून हा प्रयोग देखील यशस्वी झाला आहे.
मधुमेही रुग्णांकरिता आहार योग्य तांदूळ
व्हिटेनम व्हरायटीचा ग्रीन राईस या तांदुळात क्लोरोफील कंटेंट जास्त असल्याने या तांदूळाला हिरवा रंग प्राप्त होतो.या तांदुळास एक वेगळाच सुवास असून या तांदुळाची ग्लॅयसेमिक इन्डेक्स कमी आहे,त्यामुळेच मधुमेही रुग्णांकरिता (डायबेटीक पेशंट) हा तांदुळ आपल्या आहारात घेऊ शकतात. ॲन्टी ऑक्सीडन्ट इफेक्ट या तांदूळात आढळून येतो असे मीनेश गाडगीळ यांनी सांगीतले.
१४० दिवसात तयार होणारे वाण, एकेरी 1500 किलो उत्पादन
क्लोरोफिल कंटेट मुळे शरीरातील टॉक्सीन न्युट्रल करण्याचा गुण धर्म या तांदूळात आहे. व्हिटेनम व्हरायटीचा ग्रीन राईस हे साधारण १४० दिवसात तयार होणारे हे वाण असून, एकेरी 1500 किलो पर्यंत याचे उत्पादन मिळते.
या प्रमाणेच त्यांनी थायलंडवरुन जास्मीन राईस बियाणे आणले असून , प्रयोगीक तत्वावर त्यांनी त्याची लागवड केलेली आहे. त्याचे पुढील वर्षासाठी बियाणे तयार करण्याचे काम त्यांचे सध्या चालू आहे. जास्मीन राईस हा सर्वात सुगंधी तांदुळ म्हणून गणला जातो.
बथजीना कोलम तांदळाचे बियाणे उपलब्ध करून देणार
पूर्वी रायगड मध्ये “बथजीना कोलम नावाचे तांदूळाचे पारंपारिक वाण होते ,जे सध्या नामशेष झाले आहे, त्याचीही लागवड मीनेश गाडगीळ यानी केलेली असून पुढील हंगामात त्याचे बियाणे इतर शेतकर्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. या सर्व बियाणांचे पारंपारिक पद्धतीत संवर्धन व जतन गाडगीळ यांनी केले आहे.