

Family socially boycotted on suspicion of Black Magic in Rewdanda
रेवदंडा ( रायगड ) : अलिबाग तालुक्यात पाठवाडी येथील मांत्रिका सांगण्यावर विश्वास ठेवीत मुलाच्या मृत्यूस कारणीभूत आहेत या संशयावरुन एका कुटुंबाला गावकी भरवून चक्क वाळीत टाकण्यात आले. या प्रकरणी तुकाराम दवेजी दरोडा, रा. खैरवाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रेवदंडा पोलिसांनी रामराज खैरवाडी येथील ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
खैरवाडी येथे धर्मा दामू गडखल यांच्या 15 वर्षीय मुलाचा 2019 मध्ये आजारपणात अचानक मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूला गावातील तुकाराम दवेजी दरोडा आणि त्यांचा मुलगा कुणाल हेच कारणीभूत असल्याचे गडखल कुटुंबाला वाटत होते. पाठवाडी येथील मांत्रिक लहू गडखळ व मधू गडखल यांनी देखील तसा संशय व्यक्त केल्याने गडखल बंधुचा तुकाराम दरोडा यांच्यावरचा संशय बळावला.
कारवाई करावी म्हणून गावातील समाज मंदिरामध्ये गावकीची बैठक घेऊन तुकाराम दवेजी दरोडा यांच्यावर देवदेवस्की व करणीचा खोटा आरोप करून त्याचा दंड म्हणून 60 हजार रूपये मागणी केली. पण ती देण्यास दरोडा यांनी नकार दर्शविला. यावेळी पंच आणि ग्रामस्थ अशा उपस्थित 33 जणांनी तुकाराम दरोडा आणि कुटुंबीयांवर फिर्यादीवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला.
मंदिरात प्रवेश करण्यास बंदी, गावातील लग्नकार्यातही सहभागी होण्यास मज्जाव
दरोडा कुटुंबाला गावातील सामाजीक धार्मिक रूढीरिवाज, विधी परंपरेचे पालन करण्यास तसेच सामाजिक, धार्मिक, कार्यक्रमात प्रार्थना, सभा, मेळावा, मिरवणूका यामध्ये सहभाग घेण्यास प्रतिबंध केला. गावातील लग्न किंवा मयत अशा कार्यात सहभाग घेण्यापासून आणि गावातील मंदिरात तसेच समाज मंदिरात प्रवेश करण्यापासून वंचित ठेवण्यात आले. अशी तक्रार फिर्यादी तुकाराम दवेजी दरोडा यांनी रेवदंडा पोलिस ठाणे कडे नोंदविली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी गावकीचे पंच व ग्रामस्थ असे क्रमांक १ ते ३३ जणांवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वाळीत कुटूंबाशी संबंध ठेवल्यास दंड
आपसात संगणमत करून फिर्यादीला गावकीतून वाळीत टाकण्यात आल्याचा ठराव मंजूर करून फिर्यादीशी व फिर्यादीच्या कुटुंबाशी संबध ठेवणारांस प्रत्येकी रूपये ५ हजार रूपये दंड ठेवण्यात येईल व फिर्यादीच्या कुटूबाशी बोलणारांस ग्रामस्थांना पकडून देणाऱ्या व्यक्तीस रूपये १ हजार बक्षीस देण्यात येईल असे घोषित करण्यात आले आहे.