

Raigad Zilla Parishad
अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण 59 गटांच्या सदस्यपदाचे आरक्षण सोडत सोमवारी (दि.13) जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. यावेळी लहान मुलीने चिट्ठी काढल्यानंतर ज्यांच्या मनाप्रमाणे आरक्षण जाहीर झाले. त्यांच्या चेह-यावर आनंद तर त्यांच्या मनाविरुद्ध चिट्ठी काढल्यानंतर त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी एकूण 59 गटांच्या सदस्यपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये एकूण 30 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2 जागा, अनुसूचित जमातीसाठी 9 जागा व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 15 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरीत गट हे खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले.
अनुसूचित जाती प्रवर्गात पनवेल तालुक्यातील पालीदेवद महिला राखीव, माणगाव तालुक्यातील गोरेगाव; अनुसूचित जमाती प्रवर्गात कर्जत तालुक्यातील कशेळे, कळंब व मोठे वेणगाव, पेण तालुक्यातील महालमि-याचा डोंगर व जिते, खालापूर तालुक्यातील चैक, सुधागड तालुक्यातील राबगाव, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, पनवेल तालुक्यातील नेरे यामध्ये जिते, मोठे वेणगाव, कशेळे, बोर्लीपंचतन व चैक येथे महिला आरक्षण जाहीर झाले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गात तळा तालुक्यातील रहाटाड, पनवेल तालुक्यातील केळवणे, वावेघर व वावंजे, महाड तालुक्यातील दासगाव, खरवली व बिरवाडी, अलिबाग तालुक्यातील चेंढरे व काविर, उरण तालुक्यातील जासई, चिरनेर, कर्जत तालुक्यातील कडाव, पोलादपूर तालुक्यातील कापडे बु., रोहा तालुक्यातील आंबेवाडी व घोसाळे यामध्ये महिलांसाठी आंबेवाडी, घोसाळे, वावंजे, वावेघर, बिरवाडी, खरवली, रहाटाड व चेंढरे या गटांमध्ये महिला आरक्षण जाहीर झाले आहे.
सर्वसाधारण महिला प्रवर्गात एकूण 16 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये गव्हाण, माणगावतर्फे वरेडी, आत्करगाव, चाणजे, तळाशेत, शिहू, जांभूळपाडा, नवघर, चरई खुर्द, नेरळ, कोर्लई, पळस्पे, आंबेपूर, थळ, वडघर व आराठी या गटांचा समावेश आहे. तर खुल्या प्रवर्गात वासांबे, सावरोली, दादर, वडखळ, शहापूर, चैल, राजपुरी, नागोठणे, भुवनेश्वर, निजामपूर, मोर्बा, पाभरे, पांगळोली, करंजाडी, नडगावतर्फे बिरवाडी व लोहारे या गटांचा समावेश आहे.
यंदाच्या निवडणुकीत महिलांचे मोठे प्रतिनिधित्व दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये या आरक्षणाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रत्येक पक्ष आणि संभाव्य उमेदवार या नव्या आरक्षणानुसार आपली रणनिती आखतील.