

Kolad Passenger Issues
कोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड रेल्वे स्थानकाचे काही महिन्यांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र या स्थानकात एकच पॅसेंजर रेल्वे थांबते. येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी वीर-कोलाड ते पनवेल अशी लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रायगड जिल्ह्यातील कोलाड व विर रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले त्याचे उदघाटन 6 सप्टेंबर 2024 रोजी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले परंतु याच कोलाड स्थानकात फक्त दादर-रत्नागिरी एकच पॅसेंजर गाडी थांबते तर दुसरी गाडी दिवा सावंतवाडी कोरोना काळापासून बंद करण्यात आली आहे ती अद्याप सुरु न झाल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे हाल होतांना दिसत आहे. मग हे सुशोभिकरण कोणाच्या कामाचे? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
कोकणात रेल्वे सुरु करण्यासाठी 1977 साली मधु दंडवते रेल्वे मंत्री असतांना कोकण रेल्वेचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ई. श्रीधरण यांना कोकण महामंडळाचे अध्यक्ष नेमून त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेच्या महामार्गाचे काम सुरु झाले यानंतर 1989 ते 1990मध्ये रेल्वे मंत्री जॉज फर्नाडीस यांनी कोकण रेल्वे प्रकल्पाला चालना दिली.
कोकणचा विकास व्हावा यासाठी पिढ्यान पिढ्या कसत असलेल्या जमिनी शेतकर्यांनी कोकण रेल्वेसाठी दिल्या कोकण रेल्वे ही सुरु झाली परंतु जेथे कोकण रेल्वे सुरु झाली त्या पहिल्याच स्टेशनला रोरो सेवा सुरु झाली व धनदांडग्यांचा प्रश्न सुटला परंतु सर्वसामान्य प्रवाश्यांसाठी एकच गाडी थांबत असल्यामुळे प्रवाशी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोलाड परिसरात वाडया वस्त्या धरून 71 गावाचा समावेश होतो. येथून मुंबई जवळ असल्यामुळे पनवेल कोलाड ते वीर पर्यंत लोकल सेवा सुरु झाली तर उद्योगधंद्याना चालना मिळेल गृहिणी तसेच विद्यार्थी यांना पार्ट टाईम नोकरी ही करता येईल.
तसेच कोलाड पासून पुणे हे नजिकचे ठिकाण असुन पुणे मार्गाकडे जाणार्या लोकांचा ही फायदा होईल.सर्व बाबींचा विचार करता तसेच रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल व तरुणांना रोजगार ही मिळाले यामुळे दिवसातून तीन वेळा पनवेल कोलाड ते वीर पर्यंत लोकल रेल्वे सुरु करावी अशी मागणी प्रवाशीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
कोलाड हे व्हाईट वॉटर राप्टिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण असुन बाजूला कुंडलिका नदी, हिरवेगार निसर्ग, धबधबे सह्याद्रीची नयनरम्य पार्श्वभूमी यासाठी ओळखले जाणारे कोलाड तसेच कोलाड परिसरातील गोवे येथे असणारे श्रीमती गीता द. तटकरे पॉलिटेक्निकल असल्यामुळे येथे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून विद्यार्थी येत असतात. याच कॉलेजच्या बाजुने कोकण रेल्वे गेली आहे परंतु येथे कोणतेही लोकल सेवा सुरु नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.