

Water Taxi Connectivity
रायगड : गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळदरम्यान वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी याबाबत अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.
या वॉटर टॅक्सी सेवामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. वॉटर टॅक्सी सेवामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी चांगल्या प्रकारे जोडला जाईल. अवघ्या 40 मिनिटात मुंबईकर नवी मुंबई गाठेल. वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केला जाणार असल्याने प्रदूषणातही घट होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. याशिवाय, मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल, असेही मंंत्र्यांनी म्हटले आहे.
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला नितेश राणे यांच्या व्यतिरिक्त परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढिये यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाने सादर केलेल्या अहवालानुसार, मुंबई महानगर प्रदेशात एकूण 21 ठिकाणी जेट्टी बांधल्या जातील. पहिल्या टप्प्यात एकूण 15 जेट्टीचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर दुसर्या टप्प्यात खत जेट्टीचे काम हाती घेतले जाईल. या प्रकल्पामुळे मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होईल.
विमानतळ निर्मितीने पनवेल हे आता मध्यवर्ती ठिकाण बनले आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रोमुळे येथील वाहतूक आता पनवेलला वाहतुकीचे जाळे विणले आहे.आता वॉटर टॅक्सीमुळे मुंबईकरांना पनवेलला येणे सुलभ होणार आहे.याशिवाय रस्त्यांचे जाळेही मोठ्या प्रमाणात विणले जात आहे.जेएनपीए महामार्ग,अटल सेतू, मिसिंग लिंक आदीमुळे पनवेल परिसरातील वाहतूक आता सुसाट होणार आहे.