

पोलादपूर : समीर बुटाला
गेली अनेक वर्षे सातत्याने पावसाळ्यात बंद ठेवण्यात येणारा वरंध घाट आजही एसटी बसेस साठी बंद असल्याने अनेक प्रवासी वर्गाला भोरला जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातच यामार्गावर काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी मोरीच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आले आहेत.
पोलादपूर-महाबळेश्वर-वाई सुरूर राज्य मार्गाचे मजबुतीकरण करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोदल्याने एकेरी मार्गेने जावे लागत आहे. त्यातच काही ठिकाणी मातीचा ढिगारा खाली आल्याने वाहनचालकांना प्रवास करताना डोळ्यात अंजन घालावे लागत आहे तर सातत्याने दरवर्षी खचणाऱ्या व कोसणाऱ्या वरंध घाटातील वाहतूक कोलमडून पडत असल्याने घाटावर जाण्यासाठी प्रवासी वर्गाला ताम्हणी किंवा कुंभार्ली या दोन मार्गांनी प्रवास करावा लागत असल्याने वेळ व लांबचा प्रवास करावा लागत आहे.
पोलादपूर-वाई-सुरूर या मार्गावरून महाबळेश्वर, पांचगणीकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून, याशिवाय अन्य प्रवासी आणि माल वाहतूकही होत असते. सध्या हा घाट नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झाल्याने हा मार्ग जास्तीत जास्त चर्चित आला होता. या मार्गाने राज्य मार्गावरून राष्ट्रीय महामार्गामध्ये वर्गीत करण्यात यावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली. त्याच धर्तीवर या मार्गाचे रुंदीकरण व मजबुती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
वाई येथील घाऊक भाजीपाला व्यवसाय कोकणात जास्त प्रमाणात आणला जातो. वाईवरून भाजीपाला आणून पोलादपूर, खेड, चिपळूण, महाड, दापोली, मंडणगड येथे स्थानिक विक्रेते विकत असतात. त्याच्यासह साखर वाहतूक करणारे ट्रक, खासगी ट्रॅव्हल या मार्गवर वाहतूक करत आहेत. अनेक पर्यटक येत असल्याने या मार्गाची जलद व दर्जेदार पद्धतीने रुंदीकरणचे काम करणे गरजेचे बनले आहे. पाऊस आल्यास भोर हद्दीतील रस्त्यावर मातीचे व चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असल्याने अनेक वाहनांना ब्रेक लागत आहे. मागील आठवड्यात अनेक वाहने या चिखलात अडकल्याचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अंतर्गत रस्ते दर्जेदार करण्याची मागणी
पोलादपूर तालुक्यातील जाणारा कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आल्यानंतर प्रवास वेगाने सुखरूप होत आहे मात्र जुन्या कशेडी घाटातील रस्ता भोगाव व कशेडी बंगला रत्नागिरी हद्दीतील रस्ता खड्डेमय बनला असल्याने या भागातील नागरिकांना खड्यातून प्रवास करावा लागत. महामार्ग विभागासह राज्य मार्ग विभागाने घाट मार्गाचे कामासह तालुक्यातील अंतर्गत मार्गाचे काम दर्जेदार करावे अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.