

पालघर ः पालघर जिल्हातील प्रमुख राजकीय पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.निवडणुकीच्या तयारीसाठी पालघर मध्ये राजकीय पक्षांच्या राज्य पातळीवरील नेत्यांचे दौरे वाढले आहेत. नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का बसला असुन विस्थापित होण्याची वेळ आली आहे.निवडून येण्यासाठी सुरक्षित असलेले आरक्षित आणि खुल्या जागांवरील दावेदारांची संख्या वाढत आहे. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या जिल्हा स्तरावरील नेत्यांकडून स्वबळाची भाषा केली जात आहे.तर सत्ताधाऱ्यां विरोधात महाविकास आघाडी एकत्र आली आहे.एकूणच जिल्हा परिषद निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.निवडणुकी आधी पालघर जिल्ह्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये कुरघोडी सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडून स्वबळावर लढण्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकताच पार पडली. महाविकास आघाडी म्हणून सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार आघाडीत सामील घटक पक्षांकडून करण्यात आला. तालुका स्तरावरून उमेदवारांच्या नावांची चाचपणी तसेच आठवडा भरात बैठक घेऊन जागा वाटप पूर्ण करण्याचे नियोजन बैठकीत जाहीर करण्यात आले.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे जाहिर आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का बसला आहे.तर काही आरक्षित, खुल्या जागांवरील दावेदार वाढले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इतर मागासवर्गासाठी राखीव असलेल्या मनोर, बोईसर वंजारवाडा, कुडूस आणि चिंचणी या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.
मनोर गटातून शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील पुन्हा मैदानात आहेत तर, महाविकास आघाडी कडून माजी जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय भाजपचे मंडळ अध्यक्ष हर्षद पाटील,भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटील यांची नावं देखील इच्छिकांमध्ये आहेत.
वाडा तालुक्यातील कुडूस आणि खुपरी जिल्हा परिषद गटात उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चूरस आहे. आरक्षणामुळे वाडा तालुक्यातील महेंद्र ठाकरे खुपरी गटातून मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र याठिकाणी शिंदेगटातुन माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील इच्छुक आहेत. तर भाजपकडून माजी उपसभापती आणि वाडा तालुका भाजपा माजी अध्यक्ष मंगेश पाटील आणि डॉ.गिरीश चौधरी,दिनेश पाटील यांच्यात उमेदवारी साठी रस्सीखेच सुरू आहे. शिवाय शिवसेना उद्धव गटाकडून गोविंद पाटील देखील इच्छुक असल्याची चर्चा आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत कुणाला उमेदवारी मिळते आणि कुणाला नाकारले जाते. उमेदवारी नाकारल्यानंतर नाराजी आणि बंडखोरी बाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.