

डॉ. महेश केळुसकर
गझलच्या क्षेत्रात 'इस्लाह लेना' किंवा सल्ला घेणे हा प्रकार सर्वमान्य आहे. नव्याने गझल लिहिणारे शायर, बुजुर्ग गझलकारांचा सल्ला घेऊन पुढे जात असतात. गझल अधिक सफाईदार व शेर अधिक टोकदार होण्यासाठी बुजुर्गांच्या सल्ल्याची मदत होते.
उर्दू जाणणारे सारेच लोक शायरी करत नाहीत किंवा ती वाचतही नाहीत. पण, काही उर्दू न जाणणारे लोक मात्र या शायरीच्या प्रेमात पडताना दिसतात. ते शायरीचा आनंद लुटू शकतात याचा अर्थ भाषेखेरीज या दोघांना एकत्र आणणारं असं दुसरं काहीतरी तत्त्व यामागे असावं. हे कुठलं तत्व? शोधून काढलं पाहिजे. चकबस्त, नसीम, मुल्ला, फिराक यांसारखे हिंदू शायर अगदी मुस्लीम शायर मंडळीच्या तोडीस तोड शायरी उर्दूत करू शकतात. याचं कारण तरी काय असावं? त्यांची उठबस मुस्लीम वातावरणात होते किंवा त्यांच्यावर त्या संस्कृतीचे संस्कार असतात, एवढंच कारण त्यामागे असू शकेल का?
गझलचा इतिहास पाहिला, तर आपल्याला दिसून येतं की, शायरी ही प्रथम अफगाणिस्तान, इराण इथेच फुलली. भारतात आल्यानंतरही ती लखनऊ, दिल्ली, हैदराबाद या विशिष्ट शहरांमध्ये सुरू झाली आणि वाढली. आता यापैकी एकाही ठिकाणी समुद्र नाही. पण, उर्दू शायरीत ज्याला नाखुदा (नाखवा) म्हणतात तो मात्र गझलांमध्ये येतो. आश्चर्य वाटावं इतक्या प्रकर्षाने येतो. याचा अर्थ नाखवा म्हणजे नाखुदा हा एक काव्यसंख्येत आहे आणि तो उर्दू शायरीला अतिप्रिय आहे. मराठी गझलमध्ये मात्र नाखवा क्वचितच येतो.
आपल्यापैकी अनेकांनी मराठी गझलचे मुशायरे ऐकले असतील. मी ही ऐकले आहेत. मराठी गझलच्या शेरातील पहिला मिसरा ऐकल्यानंतर पुढल्या ओळीत कवींनं कशी कलाटणी दिली असेल, कुठला धक्का किंवा कुठला संकेत एका वेगळ्या उंचीवर नेण्यात आला असेल याची कल्पना कुठलाही श्रोता करीत नाही. तो शांतपणे पुढल्या मिसऱ्याची वाट पाहत बसतो.
या उलट उर्दू शेराचा पहिला मिसरा ऐकल्याबरोबर श्रोत्यांच्या मनात त्या विषयावरचे त्या काव्यसंकेताला धरून येणारे पाच-दहा तरी शेर उभे राहतात आणि अमुक एका उंचीवर श्रोता आधीच जाऊन बसतो. साहजिकच पुढच्या मिसऱ्यात त्या कवीने या साऱ्यांपेक्षा एक वेगळी कलाटणी दिली असेल तर श्रोत्यांकडून त्याला उत्स्फूर्त वाहवा मिळते. काव्यसंकेतांच्या खालोखाल अन्य भाषिकांना उर्दू शायरी मधील अडचणीत आणणारी दुसरी बाब म्हणजे कठीण शब्दार्थ. उर्दूतील बरेच शब्द समजण्यास कठीण असले तरी त्यांचा अर्थ शब्दकोशात शोधता येतो. संकेतांपेक्षा ते समजण्यास सोपे जातात. पण, काही शब्दांना वेगवेगळ्या अर्थाची किनार किंवा छटा लाभत असल्यामुळे काव्यात त्यांचा नेमका अर्थ समजून घेणं आवश्यक ठरतं.
उदाहरणार्थ तमन्ना, आरजू आणि हसरत, या तिन्ही शब्दांचा अर्थ तसा एकच आहे आणि तो म्हणजे इच्छा. पण, या इच्छेच्या छटा मात्र वेगवेगळ्या आहेत. तमन्ना म्हणजे इच्छा. पण ही इच्छा सहज पूर्ण होणारी असते. उदाहरणार्थ, ' मुझे शराब पीने की तमन्ना है', ही माझी इच्छा मी केव्हाही पुरवून घेऊ शकतो. आरजू म्हणजे देखील इच्छाच. पण, ती सहज पूर्ण होत नाही. त्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असते. समजा एखाद्या सामान्य माणसाला उद्या आयफेल टॉवर वर बसून शराब पिण्याची इच्छा झाली तर ती झाली आरजू. म्हणजे त्या माणसाची ही इच्छा पूर्ण होणारच नाही, असं नाही. पण त्यासाठी त्याला थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. आणि शेवटी येते ती हसरत.
' हसरत' म्हणजेही इच्छाच. पण ही इच्छा कधीच सफल किंवा पूर्ण होत नाही. म्हणजे समजा एखाद्यास अमृत प्यायची इच्छा झाली, तर ही झाली त्याची हसरत. कारण जगात अमृतच अस्तित्वात नसल्याने त्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यताच उरत नाही. उर्दू शायरीत एकाच अर्थासाठी अनेक शब्द योजण्याची काही उदाहरणं देता येण्यासारखी आहेत. मद्याचं उदाहरण घेतलं तर त्याला कधी 'शराब', कधी 'मय', कधी 'सहबा', तर कधी 'दुःख्त़रे-रज' म्हटलं जातं. आणि मद्याच्या चषकाला कधी 'सागर', कधी 'जाम', कधी 'पैमाना', तर कधी 'पियाला' असं म्हणून वेळ साजरी केली जाते. त्या मद्यापासून, प्रेयसीपासून किंवा जीवनातील एकंदर विलासी वृत्तीपासूनच परावृत्त करू पाहणाऱ्या व्यक्तीला उर्दू शायरीत नासेह, जाहिद , वाईज़, शेख अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.
यात नासेह म्हणजे धर्मोपदेशक. जा़हीद म्हणजे कर्मठ. वाईज़ म्हणजे प्रवचन देणारा व शेख म्हणजे मशिदीतील मौलवी, असे विविध अर्थ कदाचित सांगता येतील. पण, सर्वसाधारण हे सारे शब्द एकाच अर्थी वापरले जातात. मद्यामुळे चढणाऱ्या नशेलाही दोन-तीन शब्द योजले जातात. बेखुदी म्हणजे स्वतःचा विसर पडणं. तर सरूर म्हणजे शराब प्यायल्यानं तत्काळ चढणारी धुंदी, असा होतो. खुमारचा अर्थ जरा वेगळा आहे. मद्यपानानंतर बराच वेळ राहणारी धुंदावस्था म्हणजे ख़ुमार. शिवाय नशा हा शब्दही उर्दू शायरीत वारंवार वापरला जातो. काही गाजलेले शेर आणि त्यांचे अर्थ पुढीलप्रमाणे :
आँसू रुके तो क्या? नही छुपनेका राज़े इश़्क
हसरत टपक पडेगी हमारी निगाहसे |
अश्रू थांबले, म्हणून काय झालं? प्रीतीच्या या खाणाखुणा लपून का राहणार आहेत? आमच्या मनातलं नैराश्य डोळ्यांतून टपकन तुमच्यासमोर पडेल.
वो आये मेहफिलमें इतना तो मीरने देखा
फिर उसके बाद चरागोमें रोशनी न रही |
या शेरात मीर म्हणतो, 'ती मैफलीत आली हे तर मी निश्चितपणे पाहिलं. मग पुढं काय झालं कुणास ठाऊक! कारण त्यानंतर मैफलितले सारे दिवे प्रकाशहीन झाले. अंधारून गेले.' बऱ्याचदा शायर विरुद्धार्थी शब्द किंवा परस्परांत विरोधाभास दर्शवणारे शब्द जवळजवळ आणून त्यातून त्याला अपेक्षित परिणाम साधतो.
उदा. : हर किसीको ज़मानेमें, होती नही नसीब,
किस क़दर ऊंची है तेरी नीची निगाहभी |
गझलच्या क्षेत्रात 'इस्लाह लेना' किंवा सल्ला घेणे हा प्रकार सर्वमान्य आहे. नव्याने गझल लिहिणारे शायर, बुजुर्ग गझलकारांचा सल्ला घेऊन पुढे जात असतात. गझल अधिक सफाईदार आणि शेर अधिक टोकदार होण्यासाठी बुजुर्गांच्या सल्ल्याची मदत होते. उर्दू गझलच्या प्रांतात ही पद्धत अजूनही सुरू आहे. कवीच्या मूळ प्रकृती किंवा अभिव्यक्तीच्या भागालाच हात लावणार नसतील असे बदल स्वीकारण्यात कमीपणा मानण्याचं कारण नाही, असं उर्दू गझलच्या प्रांतात समजलं जातं व शायर एकमेकांशी चर्चा करून आपापल्या गझला तपासूनही घेत असतात. मराठीत मात्र गझलकारांमध्ये जी गटातटांची अटीतटीची लढाई सुरू आहे ती अंतिमतः मराठी गझलसाठी हितावह नाही.