Raigad Water Crisis : नोव्हेंबरपासून उरणमध्ये पाणीकपातीचे संकेत

परतीच्या पावसाने दडी मारल्याने रानसई धरणाची पाण्याची पातळी खालावली
Raigad Water Crisis
Raigad Water Crisispudhari photo
Published on: 
Updated on: 

उरण : राजकुमार भगत

उरण नगरपरिषदेसह तालुक्यातील २१ ग्रामपंचायती, एनएडी, ओएनजीसी आणि विविध औद्योगिक प्रकल्पांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य रानसई धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने घट होत आहे. चालू वर्षी परतीच्या पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून आज धरणाची पाणीपातळी ११४.६ फुटांवर खाली आली आहे.

येत्या काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर येत्या नोव्हेंबर महिन्यापासूनच उरण तालुक्यात पाणीकपात लागू करण्याची शक्यता एमआयडीसी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. नवरात्रीचा उत्सव संपल्यानंतर ही पाणीकपात होण्याची शक्यता आहे. आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पाणी कपात येणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली.

Raigad Water Crisis
NMIA Ground Connectivity : नवी मुंबई विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीला नवे पंख

उरण तालुक्यातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, नवीन औद्योगिक प्रकल्प आणि ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी रानसई धरणावर आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झालेली घट घरगुती वापरासोबतच औद्योगिक क्षेत्रासाठीही चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या वर्षी उरण तालुक्यात मुबलक पाऊस झाला होता आणि धरण तीन वेळा ओव्हरफ्लो झाले होते.

त्यामुळे गेल्या वर्षी ११ डिसेंबरनंतर पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र, यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणाची पाणीपातळी ११६.६ फुटांवरून ११४.३ (दिनांक ७ ऑक्टोबर) फुटांपर्यंत खाली आल्यामुळे महिनाभर आधीच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. गेल्यावर्षी या काळात हे धरण ओसंडून वाहत होते. त्यावेळी धरणात १०.०१८ एमसीएम पाणीसाठा शिल्लक होता मात्र यावर्षी या धरणात ९.२१२ एमसीएम पाणी साठा शिल्लक आहे. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल एक एमसीएम पाणी कमी आहे. धरणाची पाण्याची जास्तीत जास्त क्षमता १० एमसीएम एवढीच आहे.

Raigad Water Crisis
Pradeep Purnekar Case : पूर्णेकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल कर्नाळा जंगलातून जप्त

दुसरीकडे, पावसाच्या अभावामुळे तालुक्यातील शेतकरीवर्गही मोठ्या चिंतेत सापडला आहे. सध्या भात पीक कापणीपूर्वीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात असून शेतात भाताच्या लोंब्या तयार झाल्या आहेत. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने आणि पाऊस नसल्याने भाताचे दाणे भरण्याची प्रक्रिया प्रभावित होऊन उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाअभावी शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

  • या संभाव्य टंचाईची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करावे, गावनिहाय उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पर्यायी जलस्रोतांची व्यवस्था करावी आणि पाणीवाटपाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष येत्या काही दिवसांत होणाऱ्या परतीच्या पावसाकडे लागले आहे.

  • वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून तालुक्यातील विहिरी, तलाव आणि बंधारे यांसारख्या स्थानिक जलस्रोतांवरही ताण वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news