NMIA Ground Connectivity : नवी मुंबई विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीला नवे पंख

एसटीच्या ई-शिवाईसह चलो बस , टॅक्सी-ऑटोची सुविधा; मुंबई विमानतळासाठी दर तासाला मोफत शटल
NMIA Ground Connectivity
NMIA Ground ConnectivityPudhari file photo
Published on: 
Updated on: 

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी बस, टॅक्सी, ऑटोरिक्षा, कार भाडे आणि विमानतळ शटल अशा बहुविध वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. हिवाळी वेळापत्रकाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाची ग्राउंड कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यात येत असून, मुंबई, नवी मुंबई, पुणे तसेच मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) ७ ऑक्टोबरपासून ई-शिवाई बससेवा सुरू होत आहे. नवी मुंबई विमानतळ ते पुणे प्रवासासाठी ४५० रुपये, बोरिवलीसाठी २१० रुपये, तर दादर पूर्वसाठी १७० रुपये भाडे आकारले जाणार आहे. १२ वर्षांखालील मुलांना तसेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असलेल्या महिलांना अर्धे भाडे लागू राहणार आहे. दादरची बस सायन आणि अटल सेतूमार्गे, तर बोरिवलीची बस सीएसएमआयए टर्मिनल-१, वांद्रे आणि अटल सेतूमार्गे धावणार आहे. पुण्यासाठी दररोज दोन फेऱ्या असतील.

NMIA Ground Connectivity
Raigad October Heat : ऑक्टोबर हीटचा तडाखा,हवामान बदलाचे संकट

चलोच्या २१ फेऱ्या; एनएमएमटीच्या सात मार्गिका

चलो बसच्या दररोज २१ फेऱ्या विमानतळाला अंधेरी पूर्वेतील मरोळ, वांद्रे, दादर आणि कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरशी जोडणार आहेत. गर्दीच्या वेळेत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त क्षमता उपलब्ध केली जाणार आहे. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (NMMT) A1 ते A7 या सात समर्पित मार्गिका टर्मिनल-१ला खारकोपर, तारघर, बेलापूर, नेरूळ, पनवेल, खांदेश्वर आणि विमानतळ प्रकल्प कार्यालयाशी जोडतात. बेलापूर आणि नेरूळ मार्गावर गर्दीच्या वेळेत १५ ते २० मिनिटांच्या अंतराने बससेवा उपलब्ध आहे.

याशिवाय प्रीपेड टॅक्सी, प्रीपेड ऑटोरिक्षा आणि कार भाड्याने घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. १० ऑक्टोबरपासून भारत टॅक्सीची ४० वाहनांची समर्पित ताफ्यासह सेवा सुरू होणार आहे. विमानतळावरील अ‍ॅपआधारित टॅक्सी, कार भाडे, ऑटो आणि बसची एकत्रित वाहतूक क्षमता ४,६८९ वाहनांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यात ३,७८७ अ‍ॅपआधारित टॅक्सी, १८४ कार भाडे वाहने, १७१ ऑटो आणि ५४७ बसचा समावेश आहे.

NMIA Ground Connectivity
Mumbai Airport Flight Shift : मुंबईचे ५० लाख विमान प्रवासी नवी मुंबईकडे वळवणार

नवी मुंबई विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यात दर तासाला मोफत इंटर-एअरपोर्ट शटल सेवा उपलब्ध होणार आहे. सिटीफ्लो, आर्या आणि चलो बस यांच्या माध्यमातून ही सेवा चालविली जाणार असून, मुंबईतील दोन्ही विमानतळांदरम्यान थेट प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

विमानतळाला पनवेल, तारघर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकांशी तसेच अटल सेतू, सायन-पनवेल महामार्ग, पाम बीच रोड, अमरा मार्ग आणि एनएच-५४८ या प्रमुख मार्गांशी जोडणी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळ परिसरात दिशादर्शक फलक, वे-फाइंडिंग व्यवस्था आणि स्वतंत्र बस, शटल, आगमन, प्रस्थान व खासगी वाहनांसाठी क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत.

हिवाळी वेळापत्रकात कनेक्टिव्हिटीला वेग

२५ ऑक्टोबर २०२६ ते २७ मार्च २०२७ या कालावधीत लागू होणाऱ्या हिवाळी वेळापत्रकाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेचा विस्तार केला आहे. आगामी काळात ठाणे आणि नाशिकसाठीही बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा वाढविण्यावरही भर देण्यात येत आहे. यामुळे विमानसेवेबरोबरच रस्ते वाहतुकीची जोडणी मजबूत होत असून, नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी अधिक सुलभ वाहतूक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news