

कोप्रोली : पंकज ठाकूर
उरणला रेल्वे सुविधा आली पण तिच्या जेवढ्या सुविधा त्याच्या कईक पटींच्या असुविधांनी प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. रेल्वे सुरू होऊन आत्ता सुमारे दीड वर्ष झाले त्यानंतरही नवघर म्हणजेच न्हावा शेवा सारख्या महत्वाच्या स्टेशनच्या दक्षिण बाजूस अजूनही तिकीट खिडकीच सुरू करण्यात आलेली नसल्याने केवळ तिकीट काढण्यासाठी एकदा छप्पन पायऱ्या चढायच्या पुन्हा तेवढ्याच पायऱ्या उतरायच्या आणि तिकीट घेऊन पुन्हा तेवढ्याच पायऱ्या चढून पुन्हा स्टेशनात 56 पायऱ्या उतराव्या लागत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी कब तक छप्पन असे मिश्किल पणे बोलू लागले आहेत.
उरणच्या पूर्व भागातील नागरिकांना मुंबई , नवी मुंबई , ठाणे आदी प्रवासा साठी रेल्वेचा प्रवास हा सुकर प्रवास झाला आहे. ना धूळ ना खड्डे आणि फारशी गर्दी देखील नसते, त्यामुळे बसायला देखील आरामात मिळत असल्याने ट्रेनच्या प्रवासाला नागरिकांची पहिली पसंती आहे. या प्रवासात उरणच्या पूर्व भागातील नागरिकांना नवघर म्हणजेच न्हावा शेवा नावाचे स्थानक जवळचे पडत आहे. मात्र या प्रवासातील अत्यंत महत्वाचे स्थानक असलेल्या न्हावा शेवा म्हणजेच नवघर स्टेशन परिसरात स्थानकाच्या उत्तर दिशेला तिकीट खिडकी आहे मात्र प्रवासी हे सर्व दक्षिणेकडून येणारे असल्याने प्रवाशांना उत्तरेचे स्टेशन उलटे पडत आहे. त्यामुळे त्यांना स्टेशनच्या पलीकडे जाऊन तिकीट काढावे लागत आहे. त्यासाठी प्रवाशांना 112 पायऱ्या चढणे आणि पुन्हा तेवढ्याच पायऱ्या उतरणे अशी दररोज कसरत करावी लागत आहे. हे करतांना ज्याला अर्जंट गाडी पकडायची आहे त्याची तर पुरती तारांबळ होत असल्याचे पहायला मिळत आहे.
एवढ्या पायऱ्या चढायच्या त्या देखील घाई घाईत चढायच्या म्हणजे एखाद्याला हार्ट अटॅक येण्याची सर्वाधिक भीती असल्याचे प्रवासी संतोष म्हात्रे यांनी बोलतांना सांगितले. जे काही लोकप्रतिनिधी या सर्व सुविधा आणल्याचे श्रेय घेत आहेत त्यांना या असुविधा दिसत कशा नाहीत असा सवाल देखील म्हात्रे यांनी बोलतांना केला आहे. रेल्वेच्या तिकीट मास्तरांना या बाबत विचारले असता ते आमच्या हातात नाहीय वरिष्ठ अधिकारी वर्गाने दक्षिणेकडील तिकीट खिडकी सुरू केल्यास आणि त्यासाठी वेगळे कर्मचारी नेमल्यास नक्कीच नागरिकांना होणारा त्रास वाचण्याची आशा त्यांनी बोलतांना व्यक्त केली . विशेष म्हणजे या स्टेशनवर लिफ्टसाठी कोनाडे तयार केले आहेत मात्र त्यात लिफ्ट देखील बसविलेली नाही. त्यातच एकाच फलाटावर एक्सिलेटर आहे मात्र ते देखील बऱ्याचदा बंद असल्याचा अनुभव प्रवाशांना येत असल्याचे प्रवाशांनी बोलतांना सांगितले आहे .
अपुऱ्या सुविधांचा त्रास
विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका हा उरणच्या पुर्व भागातील नागरिकांना बसत आह. त्यामुळे ट्रेन आली खरी मात्र तिकीट खिडकी दक्षिणेला कधी येणार आणि त्यासाठी प्रवाशांना अजून किती वाट पहावी लागणार असा सवाल प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे. त्यातच रात्री 10 नंतर रिक्षा देखील अल्प असल्याने प्रवाशांना नवघर सर्कल पर्यंत चालत जाऊन उरण पूर्व भागात जावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.