

खोपोली ः दिवाळी सणांची सण सुरु झाला की, घाटमाथ्यावरील मेंढपाळ मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. दरवर्षी दिवाळीपूर्वी भातकापणी सुरु होत असते. मात्र, यावर्षी परतीच्या पावसाच्या लपंडावामुळे शेतीची कामे खोळंबळी असून, घाटमाथ्यावरुन येत असलेले मेंढपाळ आपले बिऱ्हाड घोड्यांच्या खांद्यावर टाकून कोकणाकडे प्रस्थान करण्यास सुरुवात झाली आहे. सोबत मुले आणि आपला संसार घोड्याच्या पाठीवर टाकून आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मेंढ्यांचे पोट भरण्यासाठी येत आहे.
रायगडात तुरळक ठिकाणी भात कापणी झाली असून, मेंढ्या कुठे बसविणार, हा एकच प्रश्न डोके वर काढत आहे. माळरानावर आपला संसार थाटण्याची लगबग सुरु झाली असून, मात्र या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर गवत आहे. विविध सरपटणाऱ्या सापांची भीतीमुळे मेंढपाळ हवालदिल झाला आहे. भातशेती कापली की शेतात मुबलक प्रमाणात जागा मिळत असते. यामुळे मेंढ्यांच्या निवाऱ्यासमवेत चारापाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. शिवाय भात कापणी झाल्यामुळे भातशेतीला येणारे गवत हा सकस आहार मेंढ्यांना मिळत असतो. मात्र, ते चित्र सध्या दुर्मिळ झाले आहे. शेकडो मैल अंतर कापून पावसाची चाहूल लागताच पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला जाणे हे अनेक वर्षे चाललेले समीकरण आहे.
परतीच्या पावसाने बसण्याची अडचण
कोकणाकडे आपल्याजवळ असलेल्या मेंढ्या घेऊन येताना मेंढपाळांना जणू तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच भात कापणी झाली नसल्यामुळे मेंढ्यांना निवारा कुठे द्यायचा या विचाराने मेंढपाळ चिंताग्रस्त झाले आहेत. परतीच्या पावसाच्या भीतीने भात कापणी खोळंबली आहे. तोपर्यंत मेंढ्या कुठे बसविणार? चाऱ्याचा प्रश्न जरी मार्गी लागत असला तरीसुद्धा निवारा मात्र वाऱ्यावरच राहिला आहे.