Uran Air Quality: कडक उन्हातही हवेच्या गुणवत्तेत सुधारणा; नागरिकांना मोठा दिलासा

गुणवत्ता निर्देशांक 35 ते 55
Uran Air Quality
Uran Air Qualitypudhari
Published on
Updated on

राजकुमार भगत

उरण: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात उष्णतेचा पारा चाळीशी पार गेला असून उरणमध्येही नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, या अत्यंत उष्ण आणि कोरड्या हवामानात उरणकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि काहीशी आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.

उरण परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक कमालीचा सुधारला असून, हवा ‌‘उत्कृष्ट‌’ ते ‌‘समाधानकारक‌’ श्रेणीत नोंदवली गेली आहे. यामुळे वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या उरणच्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Uran Air Quality
Mumbai Fire Brigade: 34 मजल्यापर्यंतची आग विझवता येणार! अग्निशमन दलात दाखल होणार 104 मीटर उंच अत्याधुनिक नवीन शिडी

सध्या उरण आणि परिसरात तापमान 38 ते 40 च्या आसपास रेंगाळत आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत असतानाच, दुसरीकडे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण मात्र लक्षणीयरीत्या घटले आहे.

सध्याचा उरणमधील विविध भागांत वायु गुणवत्ता निर्देशांक 35 ते 55 च्या दरम्यान नोंदवला गेला आहे. सामान्यतः औद्योगिक क्षेत्र आणि वाहतुकीमुळे उरणचा मध्यम किंवा वाईट श्रेणीत असतो, मात्र सध्या तो उत्कृष्ट ते समाधानकारक पातळीवर आला आहे. सामान्यतः नागरिकांना वाटतं की कडक उन्हाळा म्हणजे प्रदूषण आणि त्रास वाढणार.

पण यावेळच्या हवामानात एक वेगळाच निसर्गाचा नियम पाहायला मिळत आहे. या सुधारणेमागे एक रंजक हवामानशास्त्रीय कारण आहे. दुपारच्या तीव्र उष्णतेमुळे जमिनीवरील हवा प्रचंड तापते आणि हलकी होऊन वेगाने वरच्या दिशेने (आकाशाकडे) प्रवास करते.

उरण हे समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने, जमिनीवरील रिकामी झालेली जागा भरून काढण्यासाठी समुद्रावरून येणारे वेगवान आणि शुद्ध वारे जमिनीच्या दिशेने वाहू लागतात. या वेगवान प्रक्रियेमुळे जमिनीलगत साचलेले धुलीकण, गाड्यांचा धूर आणि कारखान्यांचे प्रदूषक हवेत वरच्या थरात निघून जातात किंवा समुद्राच्या दिशेने वाहून जातात. यालाच हवामान शास्त्रात व्हर्टिकल मिक्सिंग म्हणतात.

Uran Air Quality
Mumbai Water Crisis: मुंबईकरांना पाणीचिंता! तलावांनी गाठला तळ; 17 टक्के साठा शिल्लक

याशिवाय, सध्या उरण परिसरातील स्थानिक जेटी आणि बंदरांवरील काही अवजड वाहतुकीचे मार्ग अंशतः बदलण्यात आले असून, उन्हाळ्यामुळे दुपारी रस्त्यांवरील वाहनांची संख्याही काहीशी रोडावली आहे. याचाही संयुक्त परिणाम हवा शुद्ध होण्यात झाला आहे.

श्वास घेताना जडपणा कमी

उरणमधील जेष्ठ नागरिक आणि सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांनी या बदलाचे स्वागत केले आहे. उन्हाळा कडक असला तरी श्वास घेताना येणारा जडपणा कमी झाला असून, गेल्या काही वर्षांतील उन्हाळ्याच्या तुलनेत यंदा हवेतली धूळ प्रचंड कमी झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उष्णतेची लाट अशीच कायम राहणार असली तरी सागरी वाऱ्यांचा वेग चांगला असल्याने हवेची गुणवत्ता अशीच उत्तम राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news