

विठ्ठल ममताबादे
जेएनपीएः उरणचा 12 वर्षीय मयंक म्हात्रे याने भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी हे 24 किमी सागरी अंतर पोहुन पार करत नवा विक्रम स्थापित केला आहे. मयंक भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. या आधी त्याने धरमतर ते करंजा आणि घारापुरी ते करंजा हे सागरी प्रवाह पोहून पार केले आहेत. तर त्याने पोहून पार केलेले तिनही प्रवाह प्रथम पोहून पार करण्याची नोंद मयंकच्या नावावर झाली आहे.
उरण सेंटमेरीज कॉन्व्हेन्ट स्कुलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रे याने नवा विक्रम स्थापित केला आहे. भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी हे 24 किमी सागरी अंतर त्याने 7 तास 21 मिनिटे 6 सेकंद या वेळेत पार करून आपल्या विक्रमची नवी नोंद केली आहे.
मयंक भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. महत्वाचे म्हणजे मयंकने याआधी धरमतर ते करंजा जेट्टी हे 18 किमी अंतर पोहून पार केले. हा प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू होता. तर घारापुरी ते करंजा जेट्टी हे 18 कमी अंतर पोहून पार करणारा देखील तो पहिला जलतरणपटू ठरला. सलग तीन वर्षे मयंकने तीन समुद्रीय प्रवाह पोहून ओर केल्याने तो या तीनही प्रवाह पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे.
सोमवारी पहाटे 3:55 वाजता भाऊचा धक्का येथून मयंकने समुद्राच्या लाटांवर झेप घेत नव्या विक्रमाला सुरुवात केली. पहाटेचा काळोख, गार हवा, पान्याच्या लाटा त्यातच मोठमोठ्या बोटींचा येणारा अडथळा यातून मार्ग काढत त्याने निर्धारीत वेळेत विक्रम पूर्ण केला आहे. त्याने केलेल्या या विक्रमची नोंद महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेने दखल घेत त्याच्या विक्रमची नोंद केली आहे. तर करंजा जेट्टी येथे विक्रम पूर्ण होताच करंजा ग्रामस्थांनी त्याचे जल्लोषत स्वागतं करत त्याचे अभिनंदन केले.