

खारघर ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील दळणवळणाला नवे रूप देणारे प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत. विमानतळाच्या पूर्व प्रवेशद्वारासाठी तयार होणारा ईस्टर्न एंट्री इंटरचेंज क्लोअर लीप हा महत्त्वाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून पुढील सहा महिन्यांत तो सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 800 कोटी रुपयांच्या निधीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हे काम करत आले.
पनवेल शहर, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर आणि जेएनपीटी बंदरातून येणारी कंटेनर वाहतूक लक्षात घेऊन फुलपाखराच्या आकाराचा विना-सिग्नल उड्डाणपूल व जोडरस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे. या उड्डाणपुलाद्वारे गाढी नदीवरील खाडीमार्ग ओलांडून कंटेनर थेट विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू शकतील, अशी या मार्गाची रचना करण्यात आली आहे. याच धर्तीवर विमानतळाच्या उलवा बाजूस वेस्टर्न एंट्री इंटरचेंज या प्रकल्पाचे कामही सुरू आहे.
या इंटरचेंजमुळे अटलसेतूवरून मुंबईच्या दिशेने आलेल्या वाहनांना थेट विमानतळ गाठता येईल. हे दोन्ही इंटरचेंजचे प्रकल्प आखणी केलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल हे सातत्याने यंत्रणेकडे पाठपुरावा करीत आहेत. उड्डाणपुल, गोलाकार चौक व उंच मार्गांच्या जाळ्यामुळे नवी मुंबई व पनवेलचा विमानतळाशी अखंडित संपर्क साधला जाईल, ही पायाभूत सुविधा शहराच्या विकासाला मोठी गती देणारी ठरणार असल्याने विकासाला चालना मिळेल.