

जेएनपीए ः गुलाबी थंडीत शरीराचे चोचले पुरविण्यासाठी खवय्ये निरनिराळे फंडे शोधत असतो. रायगडात थंडीची चाहूल लागताच ठिकठिकाणी पोपटीचा चविष्ट घमघमाट सुटू लागल्याने खवय्ये कमालीचखूष झालेले आहेत.या पोपटीमुळे वालासह पुणेरी वर्ण्याच्या शेंगांना मागणी वाढू लागली आहे.
हिवाळ्याचा काळ म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी जेव्हा थंडी असते तेव्हा भाज्याही पिकतात, तेव्हा कोकणातील गावी शेतात मोकळ्या जागेत ही पोपटी शिजवली जाते. यामधील मुख्य घटक म्हणजे वालाच्या शेंगा, बटाटे, वांगी, मिरची, सुरण, अंडी, चिकन मसाले. या सर्व भाज्या आणि मसाले एकत्र करून एका मोठ्या भांड्यात ज्याला पोपटी म्हणतात भरले जातात आणि ते भांडे मातीमध्ये किंवा शेकोटीत गाडले जाते. त्यामुळे त्याला एक खास चव येते. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत निसर्गाच्या सानिध्यात एकत्र येऊन थंडीचा आस्वाद घेतला जातो.
पोपटी शाकाहारी तसेच मांसाहारी हे दोन्ही प्रकारात केली जाते. हिवाळ्यात शेतात पिकणाऱ्या वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, रताळी ,वांगी, बटाटे इत्यादी पदार्थ एकत्र केले जातात जर मांसाहारी पोपटी करायचे असेल तर त्यात चिकनला मसाला लावून किंवा अंडी टाकून केळीच्या पानात बांधून टाकली जाते. त्यानंतर त्या मडक्यांचे तोंड पाण्याने झाकून उलटे ठेवले जाते. त्यानंतर आजूबाजूला गवत,शेणी आणि लाकडे लावून त्याची शेकोटी पेटवली जाते. ही पोपटी शिजायला अंदाजे अर्धा पाऊण तास लागतो. दरम्यान गप्पा रंगतात गाण्याच्या मैफिली रंगवल्या जातात ,थंडीच्या दिवसातच पोपटी पार्टी होत असल्याने कुटुंबातील लहान थोर पोपटीच्या शेकोटीजवळ शेक घेत बसतात. अर्धा ते पाऊण तासाने पोपटी करणारे जाणकार मडक्यावर थोडे पाणी शिंपतात चरर असा आवाज झाला की पोपटी शिजली असे समजते.भांबुर्डे चा पाला व ओव्याचा भाजका असा खरपूस गंध पोपटीला असल्यामुळे आणि तेल व पाणी न वापरता केलेला पदार्थ असल्यामुळे पोपटी पचायला हलकी असते.त्यानंतर पोपटी शिजल्यानंतर मडके बाजूला काढून पोपटी मोठ्या परातीत काढून त्याच्यावर प्रत्येक जण ताव मारतो.