

उरण :राजकुमार भगत
उरण तालुक्यात मे महिन्याची चाहूल लागताच रखरखत्या उन्हामुळे ग्रामीण भागात पाण्याचे संकट गडद होऊ लागले आहे. तालुकयातील आठ वाड्या सध्या अधिकृतपणे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्या असून यामध्ये रानसई ग्रामपंचायतीच्या सहा आणि चिरनेर ग्रामपंचायतीच्या दोन वाड्यांचा समावेश आहे.
विशेष खेदजनक बाब म्हणजे, ज्या रानसई धरणातून संपूर्ण उरण तालुक्याची तहान भागवली जाते, त्याच धरणाच्या उशाशी असलेल्या आदिवासी वाड्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे.
रानसई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खैरकाटी, भुऱ्यांची वाडी, बंगल्याची वाडी, सागवाडी, खोंड्याची वाडी आणि मार्गाची वाडी या आदिवासी वाड्यांमधील पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे सुटलेला नाही. साधारणतः जानेवारी महिना संपला की, येथील आदिवासींची पाण्यासाठी वणवण सुरू होते.
ओएनजीसीने आपल्या सीएसआर फंडातून आणि शासनाने भारत निर्माण योजनेतून लाखो रुपये खर्च करून येथे पाणीपुरवठा योजना राबवल्या होत्या. मात्र, विहिरी आणि पाईपलाईनवर मोठा खर्च होऊनही तांत्रिक त्रुटींमुळे या योजना अयशस्वी ठरल्या, ज्याचा फटका आजही स्थानिक गरिबांना सोसावा लागत आहे.
आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत येथे रस्ते, वीज आणि सभामंडपासारखी कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असली, तरी पाणी हा कळीचा मुद्दा अद्यापही रेंगाळलेला आहे.
पक्क्या रस्त्यांमुळे दळणवळण सुलभ झाले असले, तरी हक्काच्या पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट अद्याप थांबलेली नाही. आता रेंगाळलेल्या पाणी योजना तातडीने पूर्ण होऊन रानसईच्या आदिवासींचा हा पिढ्यानपिढ्यांचा वनवास कायमचा संपणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
वाड्यांवरील टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने 31 एप्रिलपासून टँकरची व्यवस्था सुरू केली आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून तीन विहिरींचे प्रस्ताव मंजूर करून दोन विहिरी बांधून पूर्ण झाल्या आहेत. मात्र, एका विहिरीचे काम आणि उर्वरित इतर तांत्रिक कामे निधी न मिळाल्याचे कारण पुढे करत ठेकेदारांनी अर्धवट ठेवली आहेत. ही प्रलंबित कामे पूर्ण होताच आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.
रूपाली म्हात्रे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, उरण
खैरकाटी आणि भुऱ्याची वाडी येथे सध्या पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. उर्वरित वाड्यांवरील विहिरींमध्येही जेमतेम चार-पाच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असून, त्यानंतर आम्हाला टँकर किंवा थेट धरणातील असुरक्षित पाण्याचा आधार घ्यावा लागणार आहे.
मधुकर पारधी, रानसई ग्रामस्थ