

मारोती वाडेकर
हिमायतनगर : तालुक्यात एकूण ३८ गावांत वॉटर ग्रीड योजनेचे काम सुरू असून दोन वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. या कामांकडे ना प्रशासनाने ना लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याने सदर योजना रखडली असून कोट्यवधी रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या आता शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला गावात ग्रीड योजना तर पाबोंडी येथे 'जलजीवन योजनेतून' पाणी पुरवठ्याचे काम करण्यात आले आहे. नागरिकांना घरपोच पाणी मिळाले पाहिजे, यासाठी लाखो रुपये खर्च करून योजना राबविण्यात आली आहे. या योजनेचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. तसेच ग्रामपंचायतकडून घरोघरी नळ कनेक्शन देखील करण्यात आले आहे. दोन्ही गावात टाक्याही उभारण्यात आल्या आहेत.
तसेच कारला गावातील टाकीचे काम अर्धवट टाकून गुत्तेदार पसार झाले आहेत. या कामाची देखरेख करणारे खाजगी अभियंतादेखील उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्रामसेवक यांना काम करण्यासाठी हात झटकत आहेत. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी तरी गावकऱ्यांना पाणी कधी मिळणार ? हे महत्त्वाचे आहे.
दरम्यान, पंचायत समिती स्तरावरून ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. तर लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागात टँकर पुरवठा करण्याची गरज असताना अद्यापही पाणीटंचाई निवारणार्थ कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. सद्यस्थितीत तालुक्यातील एकाही गावात प्रशासनाच्या टँकरद्वारे पाणी पुरवठ्याला सुरुवात केलेली नाही. तसेच अनेक वाडी तांड्यावर देखील मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
शहरासह ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाच्या वतीने नागरिकांना उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनातील कोणत्याही प्रमुख अधिकाऱ्याने संभाव्य टंचाई ओळखून कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावातील एकाच सार्वजनिक बोअरचे पाणी प्यावे लागत आहे. दरम्यान एप्रिल महिना संपत आला असला तरी लोकप्रतिनिधींनीही टंचाई निवारणाकडे दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे.