Diwali Festival 2026 : दिवाळीत परप्रांतिय पणत्यांचा लखलखाट; पारंपरिक व्यावसायिकांची दमछाक

चायनामेडसह विजेवरील पणत्यांकडे वाढता कल; रायगडमधील कुंभार समाजाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर
Diwali Festival 2026
Diwali Festival 2026 pudhari photo
Published on: 
Updated on: 

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

दिवाळीचा सण म्हटला की घराघरांत उजळणाऱ्या मातीच्या पणत्या, त्यांचा मंद प्रकाश आणि त्यातून दरवळणारा पारंपरिक संस्कृतीचा सुगंध डोळ्यांसमोर येतो. मात्र, आधुनिकतेच्या झगमगाटात आणि चायनीज पणत्यांच्या वाढत्या आकर्षणामुळे लाल मातीच्या पारंपरिक पणत्यांचा प्रकाश आता मंदावत चालला आहे. पिढ्यानपिढ्या कुंभार समाजाने जपलेली ही कला बाजारपेठेतील स्पर्धेमुळे संकटात सापडली असून, या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुंभार बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक कुंभारवाड्यांमध्ये दिवाळीच्या कित्येक दिवस आधीपासून पणत्या बनविण्याची लगबग सुरू व्हायची. घरातील महिला, पुरुष आणि ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन लाल माती मळण्यापासून ते पणत्या तयार करणे, त्या वाळवणे आणि भाजणे अशी विविध कामे करीत असत. दिवाळीच्या काळात या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून होता. मात्र, आता बाजारपेठेत आकर्षक रंगांच्या, विविध आकारांच्या आणि सजावटीच्या चायनीज पणत्या सहज उपलब्ध होत असल्याने पारंपरिक मातीच्या पणत्यांची मागणी कमी होत आहे.

Diwali Festival 2026
Raigad Liquor Seizure : महाड तालुका पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

कमी वेळेत तयार होणाऱ्या आणि ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या चायनीज पणत्यांपुढे हाताने बनविलेल्या मातीच्या पणत्यांना बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परिणामी, कुंभार बांधवांच्या मेहनतीला अपेक्षित मोबदला मिळत नाही. वर्षभर पारंपरिक व्यवसायाची जोपासना करून दिवाळीच्या हंगामात उत्पन्न मिळविण्याचे त्यांचे गणितही बिघडत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे तरुण पिढी या व्यवसायापासून दूर जात असून, भविष्यात कुंभार समाजाची ही पारंपरिक कला लोप पावण्याची भीती व्यक्त होत आहे.

अलिबाग परिसरातील तांबडीच्या डोंगरातील एक भाग पूर्वी कुंभार व्यावसायिकांसाठी राखीव होता. या ठिकाणाला 'कुंभार खाण' म्हणून ओळखले जात असे. येथील लाल माती पणत्या तयार करण्यासाठी उपयुक्त असल्याने कुंभार बांधव या मातीचा वापर करीत असत. मात्र, सध्या या ठिकाणी जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने माती आणताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे चायनीज पणत्यांमुळे बाजारपेठेतील मागणी घटत आहे, तर दुसरीकडे कच्च्या मालाची उपलब्धता आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे पारंपरिक व्यवसाय अधिकच अडचणीत आला आहे.

Diwali Festival 2026
Raigad News : विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव

मातीच्या पणत्या म्हणजे संस्कृतीचे जतन

दिवाळीच्या सणाला मातीच्या पणत्या लावण्यामागे केवळ धार्मिक भावना नाही, तर त्यामध्ये आपल्या परंपरेचे आणि स्थानिक कारागिरांच्या कष्टाचेही प्रतिबिंब आहे. एका कुंभाराच्या हातातून आकाराला आलेली पणती अनेक घरांच्या उंबरठ्यावर प्रकाश पसरवते. त्यामुळे मातीच्या पणत्यांची खरेदी करणे म्हणजे केवळ एक वस्तू विकत घेणे नव्हे, तर पारंपरिक कलेला आणि स्थानिक कारागिरांच्या कष्टाला प्रोत्साहन देणे होय.

हाताने बनविलेल्या पणत्यांच्या मागणीत घट

पूर्वी दिवाळीच्या काळात पणत्या बनविण्याचे काम रात्रंदिवस सुरू असायचे. आता बाजारात चायनीज पणत्या सहज मिळत असल्याने आमच्या हाताने बनविलेल्या पणत्यांना अपेक्षित मागणी राहिलेली नाही. या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होत आहे. ग्राहकांनी दिवाळीत तरी मातीच्या पणत्यांना पसंती दिली, तर आमची ही पारंपरिक कला टिकून राहण्यास मदत होईल.

स्थानिक नागरिकांनी दिवाळीच्या खरेदीत आवर्जून लाल मातीच्या पणत्यांना पसंती द्यावी. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाने कुंभार बांधवांना कच्चा माल, बाजारपेठ आणि विक्रीसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अन्यथा, आकर्षक चायनीज पणत्यांच्या झगमगाटात आपल्या मातीतून जन्मलेली पारंपरिक पणती कायमची अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यश चौलकर, व्यावसायिक, रामनाथ, अलिबाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.