

खांदा कॉलनी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी पनवेल परिसरातून नव्या मार्गांची सुविधा उपलब्ध होत असताना दुसरीकडे दिशादर्शक फलकांचा अभाव वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पनवेलमधील ठाणा नाका तसेच कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी येथून सुरू झालेल्या विमानतळाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या परिसरात दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ व्हावी, यासाठी विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी येथून विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन मागील महिन्यात मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना अधिक वेगवान आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
या मार्गावरून प्रवास करताना दिशादर्शक फलक नसल्याची अडचण वाहनचालकांना जाणवत आहे. ठाणा नाका परिसरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना कोणत्या मार्गाने पुढे जायचे, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक वाहनचालक रस्त्यावरच गोंधळलेले दिसतात.
दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना ऐन वळणावर वाहनांचा वेग कमी करावा लागतो. काही वेळा चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर पुन्हा माघारी फिरण्याची वेळ येते. वाहतुकीचा खोळंबा होण्याबरोबरच अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असताना दिशादर्शक फलकांसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
प्रशासनाने ठाणा नाका, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी परिसरातील महत्त्वाच्या वळणांवर मुंबई, पनवेल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे स्पष्ट दिशादर्शक फलक तातडीने उभारावेत, अशी मागणी दुचाकी व चारचाकी वाहनचालकांकडून होत आहे.
विमानतळाकडे जाण्यासाठी नव्या मार्गांची निर्मिती होत असताना या मार्गांवर योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना तसेच विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना योग्य मार्ग समजण्यासाठी फलकांची आवश्यकता आहे.