

नेरळ : कर्जत परिसरात तिहेरी हत्याकांडाची हृदय हेलवणारी घटना ऐन गणेशोत्सवामध्ये घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या तिहेरी हत्याकांडाचे गूढ उलगडले असून मृत मदन पाटील यांचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे.
कर्जत तालुक्यांतील पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील चिकण पाडा येथे राहाणारा 35 वर्षीय तरुण मदन पाटील व त्याची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील आणि मुलगा विवेक मदन पाटील या एकाच कुटूंबातील तिघांचे मृतदेह घराजवळ असलेल्या ओहळामध्ये रविवारी सकाळी सापडले होते. या प्रकरणी हत्याकांड की आत्महत्या अशा पार्श्वभूमीवर पोलीस तपास करिता असताना मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हणमंत पाटील व त्याच्या पत्नीला पोलीसांनी अटक केली आहे.
संशयीत आरोपी हणमंत पाटील यास घेऊन घटनास्थळी पोलीसांनी सोमवारी तपास केला. त्यामध्ये अनेक धागेदोरे पोलीसांच्या हाती आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मृत मदन पाटील, त्याची पत्नी अनिशा मदन पाटील आणि मुलगा विवेक मदन पाटील या तिघांच्या मृतदेहावरिल घावांच्या जखमा दिसून आल्याने पोलीसांना हे हत्याकांड असल्याचा संशय आहे. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा ज्ञानेश्वर टेळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांच्या पाच टीम करण्यात आल्या. तसेच रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून तपासाची सुत्रे वेगाने फिरवत या प्रकरणी मुख्य संशयीत आरोपी म्हणून मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हणमंत पाटील तसेच त्याच्या पत्नीला अटक केल्याचे पोलीसांनी सांगीतले. ऐन गणेशोत्सवामध्ये हे हत्याकांड घडल्याने घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
या तीनही मृतदेहांचे मुंबई येथील जे. जे. रूग्णालयात शवविच्छेदन करून तीनही मृतदेह हे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असुन, नातेवाईकांकडून तीनही मृतदेहांवर कर्जत तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तिहेरी हत्याकांडाची हृदय हेलवणारी घटना ऐन गणेशोत्सवामध्ये घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.