

नाशिक : गेल्या आठवड्यात मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्याच मतदारसंघातील लोकार्पण सोहळ्याला निमंत्रण न दिल्याने त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्यांसह जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात विधानसभेच्या अध्यक्षांकडे विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने संबंधित ग्रामसेवकाच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला असल्याचाी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.
गुरुवारी दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी येवला मतदारसंघातील नांदूरमध्यमेश्वर येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग एकात्मिक बालविकास विभाग यांच्या योजनेअंतर्गत अंगणवाडी इमारतीचा तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी विधानसभा मतदारसंघाचा आमदार असून भुजबळांना निमंत्रण नव्हते. या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, सुरेखा नरेंद्र दराडे तसेच ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कार्यक्रमाला न बोलवून अवमान केल्याची तक्रार भुजबळ यांनी पत्राद्वारे विधानसभा अध्यक्षाकडे केली होती.
याबाबत ग्रामपंचायत विभागाने संबंधित लोकार्पण सोहळ्याच्या वेळी मतदारसंघातील आमदारांना न बोलावणे हे चुकीचे आहे. लोकार्पण झाल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाने तत्काळ अहवाल देणे आवश्यक असताना उशीरा अहवाल दिल्याचा ठपका ठेवण्यात आला असल्याचे समोर आले आहे.