

नेरळ : कर्जत तालुक्यातील मौजे भिवपुरी कॅम्प ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालय अंतर्गत टाटा पॉवर कंपनी लि. भिवपुरी उदंचन प्रकल्प १००० मेगावॅट प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी, उद्योग सेवा संदर्भातील मागण्या डावलून मनमानी सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी टाटा प्रशासन व शासनाच्या विरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे. पुरुषांसोबत आदिवासी महिलांही या साखळी उपो-षणात सहभागी झाल्या आहेत.
भिवपुरी कॅम्प ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील टाटा पॉवर कंपनी लि. भिवपुरी उदंचन प्रकल्प १००० मेगावॅट हा केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मंजूर केला आहे. त्यामध्ये झालेल्या जनसुनावणी दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत भिवपूरी कॅम्पने सादर केलेल्या अहवालातील सर्व योजनांचा तसेच टाटा पॉवर कंपनीने सदरह योजना सी. इ. आर मध्ये सामाविष्ट करण्यात येतील असे लिखित उत्तर दिले आहे. तसेच केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने सदरहू योजना विशिष्ट आणि मानक अटी शर्ती घालूनच पर्यावरण मंजुरी दिली आहे. त्या अटी शर्तीची पूर्तताही न झाल्यास मंजुरी रद्द करण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद केले असताना, सर्व नियमाचा भंग करून टाटा प्रशासन मनमानी कारभार करत असून स्थानिक लोकांचा विचार करत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सुरुंग स्फोटाने घरांना धोका नियमाचे उल्लंघन करून दिवसरात्र ब्लास्टिंग करतात त्यामुळे घरांना भेगा पडू लागल्या आहेत. भिवपुरी टाटा कॅम्प ग्रामपंचायत हद्दीतील कराळे वाडी, तापकीर वाडी भिवपुरी पांजीरा, मोरमारे वाडा येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. ब्लास्टिंग मुळे दोन ते तीन बेडयांचे नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तापकिरवाडी धनगरवाडा याला लागूनच टाटाचे कंपाउंड असून गावच्या जवळच मातीचा ढिगारा उभा केला जात आहे. गावापासून सुमारे वीस फूट उंच मातीचा ढिगारा असून जोरदार पावसात भूस्खलन होऊन हा दगड मातीचा ढिगारा तापकीरवाडी धनगरवाड्यावर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही यावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी प्रकट केली.
आमचे स्थलांतर करून पुनर्वसन करावे अशी आमची मागणी टाटा प्रशासनाने मान्य केली नाही, प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असून ब्लास्टिंगमुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असून पशु पक्षी यांना त्रास होतोय पण याकडे प्रशासनाला भेट द्यायला वेळ नसल्यानं आम्ही नाराज आहोत असेही ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे, आमच्या बोअर-वेलमुळे आम्हाला पिण्याचे पाणी मिळते पण या ब्लाटिंगमुळे आमच्या बोअरवेलच्या पाण्यावर परिणाम होणार आहे अशा विविध मागण्या ग्रामस्थांकडून केल्या असून या व इतर मागण्या मान्य होत नसल्याने अखेर ६ ऑक्टोबर रोजी सकाळी वाजल्यापासून साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी आम्हाला निवेदन दिले आहे. मात्र कोणतेही अनधिकृत काम असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या नाहीत. उपोषणसंदर्भात आम्ही आमचे प्रतिनिधी पाठवून त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कारवाई करू.
धनंजय जाधव, तहसीलदार, कर्जत
रात्रीच्या वेळी जोरदार आवाज होतात, लहान मुले उठतात, गरोदर महिलांना आवाजाचा त्रास होतोय, घरावर दगडी येतात, जेष्ठ नागरिकांना ना दिवसा ना रात्री झोप लागत. त्यामुळे आम्ही पूर्ण भयभीत झालो आहे.
रुख्मिनी हिलम, महिला ग्रामस्थ