

माणगाव : माणगाव- पुणे महामार्गा लगत रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील ताम्हिणी घाट परिसरात सुमारे 25 वर्षांच्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघात प्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताम्हिणी घाटात आता घातपाता सारखी गंभीर घटना समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मौजे सणसवाडी गावाच्या हद्दीत ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रविवारी ( 11 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. सदर इसमाच्या मानेवर तसेच डाव्या खांद्यावर चार ते पाच ठिकाणी गंभीर जखमांच्या खुणा दिसून आल्याने हा मृत्यू नैसर्गिक अथवा अपघाती नसून घातपाताचा असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, सर्वप्रथम या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
हा तरुण नेमका कोण आहे, त्याची हत्या कोणी केली, आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसून माणगाव पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास केला जात आहे. मृतदेहाची ओळख पटल्या शिवाय तपासाची पुढील दिशा निश्चित करणे कठीण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, माणगावपुणे महामार्गावरील ताम्हिणी घाटात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच आता हत्या सदृश घटना घडू लागल्यामुळे या दुर्गम घाट परिसरात गुन्हेगारीला मोठा वाव मिळत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
कमी वर्दळ, दाट जंगल आणि अपुरी निगराणी याचा गैरफायदा गुन्हेगारांकडून घेतला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या मृतदेहाची ओळख पटताच या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी, गुन्ह्याचा हेतू आणि संशयितांचा माग काढण्यासाठी तपास अधिक गतिमान होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.