

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
महाड खाडीपट्टयात गेली कित्येक वर्ष ओसाड पडलेल्या शेतीमध्ये येथील शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांचा आधार घेत आपल्या उपजीविकेचे साधन बनविले आहे.
शेती व शेतकऱ्यांवर सतत येणाऱ्या विविध संकटांची मालिका थांबण्याचे नावच घेत नसल्याचे दिसत आहे. त्यातच कडधान्य पिकावरील हमखास उत्पन्नाचे पीक असलेल्या वाल, पावटा, उडीद, तूर पिकावर नारू अमरवेल या पिवळ्या रंगाच्या परपोषी वेलीने आक्रमण करायला सुरुवात केली असुन शेतीवरील आलेल्या या पिवळ्या संकटाने बळीराजा धास्तावलेला आहे.
भात कापणीच्या हंगामाच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उशीरा कडधान्य लागवड करण्यात आली, सध्या चांगल्या प्रकारे वातावरणाची परिस्थिती असून कडधान्याचे पीक चांगले बहरायला लागले आहे.
शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असताना, कडधान्यांमध्ये वाल, पावटा, उडीद, तूर इत्यादी शेतकरीवर्गाने लागवड केलेल्या कडधान्यांच्या पिकावर आता दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील नारू या परपोषी वेलीने आक्रमण केल्याने बहरलेल्या कडधान्याच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे.
नारु परपोषी वेल कडधान्य पिकांवरील वाल, पावटा, उडीद, तूर, तागाच्या शेतीकडे जास्त आकर्षित होते. ही नारुची वेल कितीही काढली तरी पुन्हा रात्रीच्या सुमारास तिची मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्याची वेल काढणारे शेतकरी बांधव, भगिनी त्यांच्या पोटात मळमळणे, डोळे चुरचुरणे किंवा डोके जड होणे अशा प्रकारचे विकार जडत असल्याचे येथील शेतकरी वर्गाने सांगितले.
कडधान्याची पिके घेताना कोणत्याही प्रकारची खते, कीटकनाशके, नवीन बी-बियाणे मजूरदार व अन्य मशागतीचे कामे करावी लागत नसल्याने घरच्या घरी ही शेती मोठ्या प्रमाणात करता येते. कडधान्य पिकातून शंभर टक्के उत्पादन मिळत असल्याने शेतकरी वर्गाला कडधान्याची शेती परवडत असल्याने एक हमखास उत्पन्नाचे साधन बनले आहे.
कडधान्य पीक तयार होण्याचा कालावधी केवळ तीन ते चार महिन्याचा असल्याने या कालावधीत दररोज विविध कडधान्याची ताजी भाजी मिळते, तर कडधान्याच्या पिकांच्या काढणीच्या कालावधीत मिळणारे उत्पन्न बाजारात विक्री करून बऱ्यापैकी पैसा मिळत असल्याने शेतकरीवर्ग कडधान्याचे पीक शेतीमध्ये समाधानी दिसत असतो. परंतु कडधान्यावर आलेल्या संकटावर मात कशी करावी हा मोठा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उपस्थित झाला आहे.
कडधान्य पिकाला बहार येवू लागली आहे आणि पिकावर नारूची वेल यायला सुरुवात झाली आहे, तिची वाढ अशीच होत राहिली, तर कडधान्याच्या पिकाचा तुटवडा जाणवेल आणि त्यामुळे पोपटी सुध्दा लावणे मुश्कील जाईल. यासंदर्भात वारंवार येथील शेतकऱ्यांनी सदर पिवळ्या संकटापासून मुक्तता मिळावी यासाठी कृशीखात्याकडे मागणी केली आहे, मात्र थोड्याबहूत प्रमाणात काही ठिकाणी यश आले आहे, तर कित्येक ठिकाणी अजूनही मोठया प्रमाणात पिवळ्या संकटाने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. कडधान्य बहरण्याच्या काळातच हे पिवळे संकट उभे राहिल्याने पाळा मरुण पीक बहरणार नाही अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. ओद्योगिक विकास महामंडळातील रासायनिक कारखान्यातील निचरा केलेले खाडीपट्ट्यातील खाडीमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी यामुळे हे संकट अधीक वाढत चालले असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.