

महाड : महाड- म्हाप्रळ मार्गावर महाड तालुक्यातील सव गावाच्या हद्दीत शनिवारी भरधाव कारच्या धडकेत शरण्या अक्षय दवंडे (वय 8) या चिमुकलीचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने महाड शहर पोलीस ठाण्यावर धडक देत घेराव घातला.
शरन्या ही सव गावातील एका दुकानात सामान आणण्यासाठी ती गेली होती. तेथून घरी परतत असताना शिरगाव बाजुकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने तिला जोराची धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली तिला तातडीने महाडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या अपघाताने संतप्त झालेल्या सवच्या ग्रामस्थांनी आरोपीला अटक करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलीस प्रशासनाकडून जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अपघातास जबाबदार असलेल्या कारचालक फरहान अब्दुल कादिर ताजीर (वय 28, रा. अप्पर तुडील, ता. महाड) यास ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 106(1), 281,125(अ),125(ब) तसेच मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 134 व 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महाड शहर पोलीस करीत आहेत. या निष्पाप बालिकेच्या अकाली मृत्यूमुळे सव गावासह परिसरात शोककळा पसरली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.