

माणगांव : कमलाकर होवाळ
ताम्हिणी घाट परिसरातील सिक्रेट पॉइंटजवळ आढळून आलेल्या अज्ञात तरुणाच्या निर्घृण हत्येचा गुंता माणगांव पोलिसांनी अवघ्या सहा ते आठ तासांत उलगडत दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
पैशाच्या वादातून मित्रांनीच तरुणाचा गळा आवळून व कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून एक साथीदार आरोपी फरार आहे. त्याचा तपास पोलीस घेत आहेत. माणगांव पोलीस ठाण्यात रात्री अकरा वाजता अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांची माहिती व मिसिंग व्यक्तींच्या नोंदी तपासून पोलिसांनी अज्ञात मृताची ओळख पटवली. मृताचे नाव आदित्य गणेश भगत वय 22 रा. साई रेसिडेन्सी, फ्लॅट नं. 105, सेक्टर 07, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे मुळ रा ा. चोबे पिंपरी, ता. माढा, जि. सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणातील आरोपींची नावे अनिकेत महेश वाघमारे वय 26, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे तुषार उर्फ सोन्या शरद पोटोळे वय 24, रा. कर्वे नगर, पुणे यांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तिसरा आरोपी प्रज्वल उर्फ सोन्या संतोष हंबीर, रा. वारजे माळवाडी, पुणे हा फरार असून त्याचा तपास पोलीस घेत आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व त्यांचे पथक फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. फिर्यादी व त्यांचे सहकारी सणसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉइंट परिसरात ओपन प्लॉटची पाहणी करत असताना 25 ते 30 वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने डोके, गळा व खांद्यावर वार केल्याच्या खुणा दिसून आल्याने खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला.
हा तपास रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे श्रीवर्धन विभाग तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बो-हाडे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, नरेंद्र बेलदार यांच्यासह पोहवा फडताडे, घोडके, वर्तक, लहाने तसेच पोलीस शिपाई कांबळे, पठाण, तांदळे, त्रिभुवन व लांडे यांनी विशेष परिश्रम घेत तपास केला.
पोलिस तपासात उघड झाले की, आदित्य भगत व तिन्ही आरोपी हे इनोव्हा क्रिस्टा कार (एम एच 12 एक्स एम9448) मधून पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी निघाले होते. ताम्हिणी घाटात आल्यानंतर पैशाच्या वादातून आरोपींनी आदित्यचा गाडीमध्येच दोरीने गळा आवळला व त्यानंतर सणसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्या लगत मोकळ्या जागेत नेऊन कोयत्याने डोके, गळा व हातावर वार करून त्याचा निर्घृण खून केला.