

अंबरनाथ : अंबरनाथमधील भाजपाची काँग्रेस सोबतची युती संपुर्ण देशात गाजली होती. टीकेची धनी झालेली भाजपा ने शेवटपर्यंत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय खेळीने उलथापालथ झाली आणि राष्ट्रवादी च्या चार नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेना महायुतीचे सदाशिव पाटील यांना उपनगराध्यक्ष पदी निवडून आणले. या निवडणुकीत भाजपाचे प्रदीप पाटील यांचा दारुण पराभव झाला. या राजकीय खेळीने भाजपा आता विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली.
शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाने सुरुवातीपासूनच राजकारण केले. यासाठी भाजपा ने काँग्रेस 12, राष्ट्रवादी(अप गट) 4, अपक्ष 1 व भाजपा 14 असे 31 नगरसेवकांचे संख्याबळ स्वतःजवळ जमवले व शिवसेनेला दूर ठेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. शिवसेना विरोधी बाकावर बसण्याच्या मानसिकतेत असताना राष्ट्रवादी चे चार नगरसेवक भाजपातून बाहेर पडून शिवसेनेसोबत आल्याने शिवसेनेचे 27, अपक्ष 1 आणि राष्ट्रवादी 4 असे एकूण 32 नगरसेवकांचे संख्याबळ शिवसेनेकडे आल्याने भाजपा पुन्हा अल्पमतात गेली. त्यानंतर भाजपाचे स्थानिक नेते गुलाबराव करंजुले आणि नगरसेवक अभिजित करंजुले यांनी शनिवार 10 जानेवारी रोजी मध्यरात्री उशिरा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन युतीची बोलणी केली.
युतीची बोलणी यशस्वी झाल्यानंतर रविवारी भाजपाने पत्रकार परिषदेत युती जाहीर करायचे होते. मात्र भाजपाने तसे न करता युती करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर सोमवारी झालेल्या उप नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना महायुतीचे सदाशिव पाटील 32 विरुद्ध 28 असे चार मतांनी विजयी झाले. त्यामुळे आता भाजपाचा नगराध्यक्ष असताना देखील भाजपा विरोधी बाकावर आली असून सत्तेची चावी पुन्हा शिवसेनेकडे आली असल्याने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची राजकीय खेळी भाजपावर भारी पडल्याचे बोलले जात आहे.
भाजपाने काँग्रेसला सोबत का घेतले? अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आल्याने शिवसेना सर्वात मोठा पक्ष असताना भाजपाने शिवसेनेसोबत युती न करता काँग्रेसला सोबत का घेतले? आज भाजपा चा उपनगराध्यक्ष पराभूत झाल्याने नगराध्यक्ष जरी भाजपाचा असला तरी सत्ता मात्र शिवसेनेची असून भाजपा ला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. भविष्यात भाजपाला शिवसेनेसोबत युती करायची असल्यास शिवसेनेची दारे कायम उघडी आहेत.
डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
राष्ट्रवादी (अप. गट) चे सदाशिव पाटील यांनी आपल्या चार नगरसेवकांसोबत सुरुवातीला भाजपाला पाठिंबा दिला होता. भाजपाने काँग्रेस चे 12, राष्ट्रवादी 4, अपक्ष 1 आणि भाजपा 14 असे एकूण 31 संख्याबळ जमवून शिवसेनेला दूर करत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांनी भाजपाची साथ सोडून शिवसेनेला पाठिंबा दिल्याने सत्तेची समीकरणे बदलली व सोमवारी 12 जानेवारी रोजी झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सदाशिव पाटील यांच्या विरोधात नगरपालिकेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना पालिकेतून बाहेर काढले.
अंबरनाथ नगरपालिकेत एकूण 59 सदस्यांपैकी शिवसेनेकडे 32 आणि भाजपाकडे 27 असे संख्याबळ असल्याने 5 स्वीकृत सदस्यांपैकी 3 स्वीकृत शिवसेनेकडे आणि 2 स्वीकृत सदस्य भाजपाकडे येणे अपेक्षित असताना भाजपाने दिशाभूल करून एक स्वीकृत नगरसेवक पद आपल्या गोटात वळवले. यावेळी सभागृहात मोठा गदारोळ सुरू असताना मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सभेचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले. शिवसेनेकडून देखील जिल्हाधिकारी यांना त्यासंदर्भात पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भाजपाकडील एक स्वीकृत सदस्य पद रद्द होईल, असे बोलले जाते.