

सुधागड : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावाजवळील अंबा नदी पात्रात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास म्हशी आणण्यासाठी गेलेला गुराखी झिमा तुकाराम बावधाने (वय 55 वर्ष ) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची व रेस्क्यू टीम आणि पाली पोलीस यांच्या मदतीने अथक प्रयत्नाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. झिमा बावधाने हे पाण्यात बुडाल्याची माहिती पाली पोलिसांना मिळाली. त्यांनी ताबडतोब सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला संपर्क केला.
सोमवारी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या टीमने झिमा बावधाने यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधारामुळे शोध मोहिमेत अडथळे निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळी पुन्हा सहाय्याने शोध घेतला असता पाण्यात तळाशी बुडालेल्या झिमा बावधाने यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमने तत्काळ मदतीचा हात पुढे ठेवून मदत कार्य केले.