

सफाळे ः सफाळे व केळवे पोलिसांच्या दक्ष व तत्पर कामगिरीमुळे गॅस सिलिंडर चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश झाला असून, चार गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार केळवे व सफाळे परिसरात घरफोडी करून गॅस सिलिंडर चोरीच्या घटना वाढल्या होत्या.
या संदर्भातील गुन्हे केळवे पोलीस ठाण्यात दाखल होते. पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली. याप्रकरणी अजय अंबात्त, (32 )व चंदू वळवी, (25) या दोघांना अटक केले आहे. त्यांच्याकडील अधिक चौकशीत आणखी चार गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या ताब्यातून 23 गॅस सिलिंडर तसेच 1, 28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरले, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभा राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी दत्ता शेळके यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली.