

रायगड ः रेवस-करंजा सागरी मार्गावरील 34 कोटी खर्चाच्या रो-रो जेट्टीचे काम कंत्राटदार अर्ध्यावरच सोडून गेल्याने मागील काही महिन्यांपासून हे काम रखडले आहे. तसेच, हे काम पूर्ण करण्यासाठी खर्चात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुंबई सागरी महामंडळाचे कार्यकारी अभियंता मनिष मेतकर यांनी दिली आहे.
रेवस-करंजा रो-रो प्रकल्पाचे काम सागरमाला योजनेतून सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या कामावर मोठ्या प्रमाणावर खर्चही करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही या सागरी मार्गावरील काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रो-रो सेवा सुरू झालेली नाही. करंजा बंदरातील रो-रो जेटीचे काम पूर्ण झाले असून रेवस येथील रो-रो जेट्टीचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे.
येथे काही प्रमाणात बांधकाम, ब्रेकवॉटर जेट्टी, ड्रेझिंग, वाहनतळ व जोडरस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. समुद्रातील पायलिंगची बहुतांश कामेही अद्याप अपुऱ्या अवस्थेत आहेत. मात्र, ठेकेदार जेट्टीचे काम अपूर्ण सोडून गेल्याने करंजा-रेवस रो-रो सेवेचे काम रखडले आहे. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी आचारसंहिता संपुष्टात येताच आता नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.या विलंबामुळे कामाच्या खर्चातही वाढ होणार आहे. निविदा प्रक्रीयेनंतर वर्षभराच्या कालावधीत रखडलेल्या करंजा-रेवस रो-रो सेवेचे काम पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई सागरी महामंडळाचे कार्यकारी अभियंता मनिष मेतकर यांनी दिली.
दरम्यान, रेवस व करंजा दरम्यान प्रवासी रो रो सेवा प्रस्तावित आहेत. या अनुषंगाने रेवस व करंजा बंदरांवर कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र ही कामे रखडली आहेत. तसेच रेवस करंजा दरम्यान सागरी पूल मंजूर आहे. रेवस करंजा पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेवस ते करंजा दरम्यान अंतर वाहनाने दहा मिनिटांच्या आत पार करणे सहज शक्य होणार आहे. तर या मार्गावरील रो-रो जहाजात वाहने पार्क करणे, त्यांनतर जलमार्गे प्रवास पूर्ण केल्यानंतर जहाजातून वाहन बाहेर काढणे यात वेळ जाणार आहे. यामुळे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रो रो सेवेला प्रतिसाद मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अलिबाग आणि उरण तालुक्याला जोडणारे हे मार्ग रायगड जिल्हयासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या मार्गांमुळे मुंबई आणि नवी मुंबई आणखी जवळ येणार आहे. गेली अनेक वर्षे या मार्गांबाबत चर्चा सुरु आहे. आता या कामांना काही प्रमाणात सुरुवात झालेली असली त्याला वेग आलेला नाही. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
करंजा-रेवस मार्गावरील रो-रो जेट्टीचे काम संबंधित कंत्राटदाराने अर्ध्यावरच सोडले आहे. त्यामुळे हे काम काही महिन्यांपासून रखडले आहे. तसेच, हे काम पूर्ण करण्यासाठीच्या खर्चात देखी वाढ झाली आहे. त्यामुळे आता नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मनिष मेतकर, कार्यकारी अभियंता, मुंबई सागरी महामंडळ