

World Turtle Day Special News
रायगड : जयंत धुळप
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून कोसळत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या किनारपट्टीतील ऑलीव्ह रिडले सागरी कासवाची एकूण ९ घरट्यांवर मोठी आपत्ती आली होती. वन विभागाच्या कोकण विभागीय कांदळवन कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने या नऊ ठिकाणी पाहोचून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या नऊ घरट्यांतील सुमारे ९०० अंडी अन्यत्र हलवून, तत्काळ हॅचरीची निर्मीती करुन संरक्षित करण्यात यश मिळविले आहे.
२३ मे या जागतिक कासव दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही ऑलिव्ह रिडले सागरी कासवाची ही ९०० अंडी संरक्षित करुन शकलो याचा आनंद होत असल्याची भावना वनविभागाच्या कोकण विभागीय कांदळवन कक्षाचे उप वन अधिकारी समीर शिंदे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केली.
ऑलिव्ह रिडले कासवांच्या माद्यांचा विणीचा हंगाम नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत असतो. परंतू यंदा हा हंगाम मे महिन्यापर्यंत लांबल्याचे दिसून येत आहे. सागरी कासवांच्या माद्या किनाऱ्यांवर खोल खड्डा करुन म्हणजेच घरटे तयार करुन त्यामध्ये अंडी घालतात. साधारण एक मादी कासव १०० ते १५० अंडी घालते. ४५ ते ५५ दिवसांमध्ये या अंडयांमधून पिल्ले जन्माला येतात, या ९०० अड्यांमधून देखील ४५ दिवसांनी पिल्ले जन्माला येणे अपेक्षीत असल्याचे त्यांनी अखेरीस सांगीतले.