

जैवविविधतेच्या द़ृष्टीने कोकणची सागरी किनारपट्टी समृद्ध आणि सुरक्षित झाली आहे, असा निष्कर्ष सागरी जीव अभ्यासकांनी काढला आहे. आणि या निष्कर्षामागे या कोकण किनारपट्टीतील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या सागरी किनारपट्टी गेल्या 22 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या व नामशेष होण्याच्या मार्गावरील आणि म्हणूनच अतिसंरक्षित श्रेणीत गणना झालेल्या ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या संरक्षण आणि संवर्धन मोहिमेचे यश आहे.
कोकणातील या तीन जिल्ह्यांच्या किनारपट्टीत सन 2003 मध्ये नामशेष होण्याच्या मार्गावरील ऑलिव्ह रिडले या कासवाची एकूण 254 पिल्ले जन्माला आली आणि सुखरुपपणे समुद्रात मार्गस्थ झाली होती. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ प्राणी अभ्यासक विश्वास दत्तात्रय तथा भाऊ काटदरे यांनी आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षण, प्रजोत्पादन आणि संवर्धन याकरिता मोहीमच सुरु केली.
या त्यांच्या प्रयत्नांना पुढील काळात कोकणातील अन्य निसर्गप्राणी प्रिय संस्था आणि शासनाच्या वन विभागाची साथ लाभली आणि गेल्या 22 वर्षांपूर्वी 250 असलेल्या कासवांच्या पिल्लांची संख्या आता 4 लाख पिल्ले अशी विक्रमी प्रमाणात वाढली आहे आणि म्हणूनच कोकणच्या समुद्र किनार्यांच्या समृद्ध आणि सुरक्षित जैवविविधतेवर ऑलिव्ह रिडले कासवांनी आता शिक्कामोर्ब केले आहे.
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परिणामी अतिसंक्षित श्रेणीत समावेश करण्यात आलेल्या ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांची 5 ते 7 घरटी गुहागरच्या समुद्र किनारी सन 2000 मध्ये प्रथम आढळून आली होती. त्यावेळी या कासवांच्या घरट्यात कासवाच्या मादीने घातलेली सुमारे 150 अंडी संरक्षीत करुन त्यांतून पिल्ले जन्माला येईपर्यंतची दक्षता सह्याद्री निसर्ग मित्रचे स्वयंसेवक व स्थानिक ग्रामस्थ यांच्या माध्यमातून घेण्यात आली. पहिल्या वर्षी या 150 अड्यांतील पन्नास टक्के म्हणजे 75 अंड्यातून पिल्ले जन्माला आली आणि सुरक्षितपणे समुद्रात झेपावल्याचे सह्याद्री निसर्ग मित्रसंघटनेचे संस्थापक व जेष्ठ प्राणी अभ्यासक विश्वास दत्तात्रय तथा भाऊ काटदरे यांनी सांगीतले.
पहिल्याचवर्षी 75 पिल्लांना वाचवून सुरक्षित पणे समुद्रात सोडण्यात यश आल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि निसर्ग मित्र यांचा उत्साह वृद्धींगत झाला आणि कोकणच्या किनारपट्टीत आलिव्ह रिडले समुद्र कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जनजागृती मोहिमच सुरु झाली. या मोहिमेस स्थानिक ग्रामस्थांचा लाभलेला सक्रीय सहभाग हा अत्यंत महत्वाचा होता. याच संवर्धनाच्या प्रयत्नांतून कासव महोत्सव आयोजित करुन जनजागृती करण्याची संकल्पना पूढे आली आणि त्यातून सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धन मोहीमेस शासनाच्या वन विभागाची साथ मिळाली.
सन 2003 पर्यंत सह्याद्री निसर्ग मित्रसंघटनेचे नेटाने चालवलेली ही मोहिम पूढे वन विभागाच्या कांदळवन कक्ष आणि मॅनग्रु फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गतीमान झाली आणि सद्यस्थितीत त्यांच्याच माध्यमातून निसर्ग मित्र व स्थानिकांच्या सहयोगातून रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीत ही कासव संवर्धन मोहीम अत्यंत जोमाने सुरु असल्याचे भाऊ काटदरे यांनी सांगीतले.
ज्या किनार्यावर कासवाच्या पिल्लांचा जन्म झाला, तो किनारा त्यांच्या स्मृतीमध्ये कायमचा राहातो. आणि या पिल्लामधील मादी कासव पिल्ले मोठी झाल्यावर आपला जन्म झालेल्या किनार्यावरच येवून घरटं करुन अंडी घालतात, हे जागतीक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. आणि त्याच अभ्यासानुसार सन 2003 मध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या तिन जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीत जन्माला आलेल्या ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांतील मादी कासव पुन्हा याच किनार्यावर येवू लागली आणि त्यांच्या घरच्यांची संख्या 250 झाली. त्यांतील एकुण 4500च्यावर अंड्याचे संरक्षण व संवर्धन करण्यात आले आणि त्यांतून तब्बल 4500 पिल्ले जन्माला येवून समुद्रात झेपावल्याचे भाऊ काटदरे यांनी सांगीतले.
त्यानंतर दरवर्षी या तिन जिल्ह्याच्या किनारपट्टीत कासवांच्या घरट्यामध्ये सातत्याने वाढ होत गेली आणि गेल्यावर्षीच्या विणीच्या हंगामात रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीत विक्रमी प्रमाणात म्हणजे तब्बल 4500 घरटी आढळून आली. प्रत्येक घरट्यात सरासरी 150 या प्रमाणे एकूण अंडी 6 लाख 75 हजार होती. त्यांतून 4 लाख 5 हजार कासवांच्या पिल्लांचा जन्म झाला आणि ती समुद्रात झेपावल्याचे काटदरे यांनी पूढे सांगीतले.
यंदाच्यावर्षी समुद्री कासवांच्या विणीच्या हंगामाला कोकण किनारपट्टीवर सुरुवात झाली आणि रायगडमधील दिवेआगर,श्रीवर्धन, मुरुड येथील समुद्र किनार्यानंतर प्रथमच अलिबाग तालुक्यांतील किहीम समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादिने घरटे करुन 160 अंडी घालून ती समुद्रात परतली आहे. या घरट्याचे संरक्षण व संवर्धन वन विभागाचा कांदळवन कक्ष,किहिम ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ यांच्या माध्यमातून करण्यात आले आणि 108 पिल्ले जन्माला येवून समुद्रात सुखरुप झेपावल्याचे वन विभागाच्या कोकण विभागीय कांदळवन कक्षाचे वन अधिकारी समीर शिंदे यांनी सांगीतले. दरम्यान अलिबागसह जिल्ह्याच्या किनारपट्टीत तसेच रत्नागिरी व सिधुदूर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीत देखील कांदळवन कक्षाच्या माध्यमातून स्थानिकांच्या सहयोगाने किनार्यांवर अंडी घालण्याकरिता येणार्या कासवांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सद्यस्थितीत सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीत पाच ते सहा ठिकाणी असलेली कासवाची घरटी संरक्षित करण्यात आली असल्याचे शिेंदे यांनी पूढे सांगीतले.
महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीतील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनार्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 9 , रत्नागिरीमधील 21 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 किनार्यांच्या समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च हा प्रामुख्याने सागरी कासवांचा विणीचा हंगाम आहे. यंदा हा हंगाम मे महिन्यापर्यंत लांबला आहे. सागरी कासवांच्या माद्या किनार्यांवर खोल खड्डा करुन म्हणजेच घरटे तयार करुन त्यामध्ये अंडी घालतात. साधारण एक मादी कासव 100 ते 150 अंडी घालते. 45 ते 55 दिवसांमध्ये या अंडयांमधून पिल्ले जन्माला येतात, असेही शिंदे यांनी सांगीतले.
भरतीमुळे कासवांनी वाळूमध्ये तयार केलेली घरटी बुजण्याचा धोका असतो. त्यामुळे अंडी देऊन मादी कासव समुद्रात परतल्यानंतर कासवमित्रांकडून ही अंडी सुरक्षितरीत्या घरट्याबाहेर काढली जातात. त्यानंतर भरतीरेषेपासून दूर कृत्रिम घरटयांची निर्मिती केली जाते. त्या जागेला ’हॅचरी’ म्हटले जाते. या हॅचरीत मादी कासवाने केलेल्या खडयाप्रमाणेच कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्याचा आकार मूळ आकार एवढाच ठेवला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. यावेळी मूळ खड्यातील काही वाळू कृत्रिम खड्यात टाकण्यात येते. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंडयांमधून बाहेर पडलेली पिल्ले अन्यत्र भरटकू नयेत याकरिता जाळीदार टोपले ठेवले जाते. पिल्ले जन्माला आल्यावर त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात येत कांदळवन कक्षाचे वन अधिकारी समीर शिंदे यांनी अखेरीस सांगीतले.