International Day for Biological Diversity |पश्चिम घाट : 'पृथ्वीचा चमत्कार'!

जैवविविधता पृथ्वीवरील सर्व जीवनाचा मूलभूत आधार
 Importance Of Biodiversity
Western Ghats(Pudhari Photo)
Published on
Updated on
Summary

Importance Of Biodiversity : जैवविविधता ही पृथ्वीवरील सर्व जीवनाचा मूलभूत आधार आहे. ती मानवी आरोग्य, पृथ्वीचे स्वास्थ्य आणि सर्वांसाठी आर्थिक समृद्धी यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अन्न, औषधे, उर्जा, स्वच्छ हवा आणि पाणी, नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण, तसेच विरंगुळा आणि सांस्कृतिक प्रेरणा यासाठी आपण जैवविविधतेवर अवलंबून आहोत. आज (दि. २२ मे) आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आहे. यानिमित्त जैवविविधता म्हणजे काय व त्या जैवविविधतेचा आपल्या पश्चिम घाटाशी काय संबंध ते थोडक्यात पाहू….

सूर्यमालेत पृथ्वीचे स्थान अनुकूल असल्यामुळे येथे जीवनासाठी आवश्यक असलेले पर्यावरण उपलब्ध झाले आहे. या पर्यावरणामुळेच पृथ्वीवर सजीव अस्तित्वात आहेत. पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरण आढळते, त्यामुळे सजीव प्राणी, पक्षी, झाडे, सूक्ष्मजीव यांच्यामध्येही विविधता दिसून येते. सजीव आपले जीवन टिकवण्यासाठी सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेतात, म्हणजेच ते अनुकूलन करतात. या प्रक्रियेत त्यांच्या शरीराच्या रचनेत आणि जीवनशैलीत बदल होत जातो. प्रत्येक परिसंस्थेमध्ये विविध प्रकारची झाडे, प्राणी आणि सूक्ष्मजीव असतात. ही विविधता म्हणजेच जैवविविधता होय. पर्यावरणातील वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांमध्ये खूप विविधता आढळते. यामध्ये वनस्पती हा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण आपल्याला अन्न, औषधे, इंधन यासारख्या अनेक गरजा वनस्पतींकडून भागवता येतात. जगात विविध प्रकारचे हवामान आणि पर्यावरण असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या जाती आढळतात.

पश्चिम घाट जगातील आठ प्रसिद्ध जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक

भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत उत्तर ते दक्षिण पसरलेला डोंगराळ भाग म्हणजे पश्चिम घाट. या पर्वतरांगांचे वय हिमालयापेक्षाही जुने आहे. पश्चिम घाट सुमारे १६०० किलोमीटर लांब असून यामध्ये दाट जंगल, नद्या, डोंगर व नैसर्गिक सौंदर्य दिसून येते. याचा भारतीय मान्सूनवर मोठा प्रभाव असतो, म्हणूनच याला 'पृथ्वीचा चमत्कार' असेही म्हटले जाते. पश्चिम घाट हा जगातील आठ प्रसिद्ध जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक आहे. गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेपासून गोवा, कर्नाटक, केरळपर्यंत पसरलेला हा भाग अनेक दुर्मिळ प्राणी व वनस्पतींसाठी ओळखला जातो. उदाहरणार्थ, चांदोली अभयारण्यात आढळणारी ‘नरक्या’ वनस्पती भविष्यात कर्करोगावर उपचारासाठी उपयुक्त ठरू शकते. याठिकाणी काही वनस्पती आणि प्राण्यांचे प्रकार असे आहेत की जे जगात अन्यत्र कुठेही आढळत नाहीत. म्हणूनच या भागाकडे "हॉट स्पॉट रिजन" म्हणून पाहिले जाते.

पश्चिम घाटाची जपणूक आवश्यक का?

पश्चिम घाटात जैवविविधतेचा अमूल्य ठेवा आहे; पण अलीकडे येथे मोठ्या प्रमाणावर विकासकामे, वनतोड, रबर व चहाची लागवड, खाणकाम, पवनचक्क्या, यांसारखे मानवी हस्तक्षेप होत आहेत. त्यामुळे येथील नैसर्गिक परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर २ जुलै २०१२ रोजी युनेस्कोने रशियातील सेंट पिट्सबर्ग येथे एक जागतिक बैठक घेतली, ज्यात २१ देशांनी सहभाग घेतला. याच बैठकीत पश्चिम घाटाला 'जागतिक वारसा' (World Heritage Site) म्हणून मान्यता दिली गेली. त्यानुसार पश्चिम घाटातील ३९ ठिकाणे पर्यावरणीय दृष्टिकोनातून संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली.पश्चिम घाटाला जागतिक वारसा दर्जा मिळाल्यामुळे येथे होणाऱ्या घडामोडींबाबत सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती द्यावी लागते आणि या भागात बिनधास्त विकासकामे करता येणार नाहीत.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन : या वर्षीची थीम - 'निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास'

आज जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिन २०२५ ची थीम आहे – "निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास". ही थीम जैवविविधतेचे संवर्धन आणि टिकाऊ विकासाचे उद्दिष्ट (Sustainable Development Goals - SDGs) तसेच कुनमिंग-मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता चौकट (Kunming-Montreal Global Biodiversity Framework - KMGBF) यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंध अधोरेखित करते.२०२५ मधील मोहिमेचा उद्देश म्हणजे जैवविविधतेच्या महत्त्वाविषयी जनजागृती करणे आणि तिच्या संवर्धनासाठी कृती करण्यास प्रवृत्त करणे. ही मोहिम व्यक्ती, संस्था आणि सरकारांना नैसर्गिक परिसंस्था जपण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करते. निसर्गाशी सुसंवाद साधून आपण पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करू शकतो.

प्रा. डॉ समीर अरुण बुटाला, भूगोल व पर्यावरण विभाग प्रमुख, सुंदरराव मोरे महाविदयालय, पोलादपूर रायगड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news