

अनिकेत मोहित
श्रीवर्धन: निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण समुद्रकिनारा, ऐतिहासिक वारसा, नारळी-पोफळीच्या बागा आणि कोकणी संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेल्या श्रीवर्धनमध्ये पर्यटन हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार बनला आहे. मात्र, पर्यटनाचा हंगाम संपल्यानंतर पर्यटकांची संख्या कमी होताच शहरातील अनेक व्यावसायिकांच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम जाणवू लागतो.
हॉटेल, लॉजिंग, खानावळी, पर्यटनाशी संबंधित छोटे व्यवसाय, घोडागाडी, स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेते, किरकोळ दुकानदार यांच्यापासून ते स्थानिक उत्पादकांपर्यंत अनेकांचे अर्थचक्र पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे ‘हंगामी पर्यटन’ऐवजी ‘बारमाही पर्यटन’ ही श्रीवर्धनची गरज बनली आहे.
गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ, नववर्ष तसेच उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये श्रीवर्धनला पर्यटकांची मोठी गर्दी होते. या काळात शहरातील बाजारपेठ, हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्री आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना चांगली उलाढाल मिळते. मात्र, गर्दीचा हंगाम संपल्यानंतर त्याच व्यवसायांसमोर पुन्हा ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ येते. पर्यटनातील ही हंगामी रचना बदलल्याशिवाय स्थानिक युवकांना वर्षभर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे कठीण असल्याचे चित्र आहे.
श्रीवर्धनच्या पर्यटनाची व्याप्ती केवळ समुद्रकिनाऱ्यापुरती मर्यादित ठेवण्याऐवजी स्थानिक संस्कृती, ऐतिहासिक स्थळे, पारंपरिक खाद्यसंस्कृती, गावाकडील जीवनशैली, समुद्री पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि कोकणी उत्पादनांशी पर्यटन जोडण्याची गरज व्यक्त होत आहे.
पर्यटकांना केवळ एक दिवस समुद्रकिनाऱ्यावर फिरवून परत पाठविण्याऐवजी दोन-तीन दिवसांचा मुक्काम वाढेल, अशा पर्यटन पॅकेजची निर्मिती झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होऊ शकतो.
स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ
श्रीवर्धन परिसरातील नारळ, सुपारी, कोकम, आंबा, काजू, सुकामासा, कोकणी मसाले आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना पर्यटकांमध्ये मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. स्थानिक महिलांचे बचतगट, छोटे उद्योजक आणि युवक यांनी तयार केलेल्या वस्तूंना पर्यटनस्थळी नियोजित बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाचा पैसा थेट स्थानिकांच्या हातात जाण्यास मदत होऊ शकते.
आज पर्यटक श्रीवर्धनला येतो; मात्र त्याच्या खर्चाचा मोठा हिस्सा स्थानिक उत्पादनांच्या खरेदीकडे वळविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था कितपत आहे, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. ‘श्रीवर्धनला या आणि श्रीवर्धनचेच उत्पादन घेऊन जा’ अशी संकल्पना राबविल्यास व्यवसायांना आधार मिळू शकतो.
ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी
शहरातील हॉटेल व्यवसायाबरोबरच परिसरातील गावांमध्ये होमस्टे, ग्रामीण पर्यटन आणि पारंपरिक कोकणी जीवनाचा अनुभव देणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन दिल्यास पर्यटकांचा मुक्काम वाढू शकतो. स्थानिक घरगुती पदार्थ, कोकणी जेवण, भातशेती, नारळी-पोफळीच्या बागा, पारंपरिक कला आणि स्थानिक सण-उत्सव यांचा पर्यटनाशी मेळ घालता येऊ शकतो.
यातून स्थानिक महिलांना घरातूनच उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याबरोबरच युवकांना मार्गदर्शक, वाहनचालक, खाद्यपदार्थ, डिजिटल मार्केटिंग, होमस्टे व्यवस्थापन आणि पर्यटन सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळू शकतात. आज प्रश्न केवळ ‘श्रीवर्धनला किती पर्यटक आले?’ एवढाच राहिलेला नाही. ‘आलेल्या पर्यटकातून स्थानिक अर्थव्यवस्थेला किती फायदा झाला आणि वर्षभर स्थानिकांना किती रोजगार निर्माण झाला?’ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे.
दिघी बंदरामुळे नव्या संधींची अपेक्षा
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदर आणि त्याभोवती विकसित होणाऱ्या आर्थिक हालचालींकडेही स्थानिकांच्या अपेक्षेने पाहिले जात आहे. बंदराशी संबंधित उद्योग, सेवा, वाहतूक, पुरवठा साखळी आणि ancillary व्यवसायांमध्ये स्थानिक युवकांना संधी मिळाल्यास पर्यटनाबरोबरच औद्योगिक रोजगाराचे दुसरे क्षेत्र निर्माण होऊ शकते. त्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण, आयटीआय अभ्यासक्रम, रोजगार मेळावे आणि स्थानिक युवकांची कौशल्य नोंदणी यांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
नियोजनही तितकेच महत्त्वाचे
पर्यटकांची संख्या वाढणे हीच पर्यटन विकासाची अंतिम कसोटी नाही. त्यासाठी स्वच्छ समुद्रकिनारे, पुरेशी पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, सुरक्षित वाहतूक, दिशादर्शक फलक आणि आपत्कालीन आरोग्य सुविधा या मूलभूत बाबी सक्षम असणे आवश्यक आहे. पर्यटन हंगामात निर्माण होणारी गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणेही गरजेचे आहे.