

श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन तालुक्यातील हवामान, मातीची रचना आणि शेतकऱ्यांची आधुनिक बागायतीकडे वाढलेली वाटचाल यामुळे यंदाचा काजू हंगाम अत्यंत दमदार ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तालुक्यात काजू पिकास अनुकूल वातावरण असल्याने बागायतदारांकडून वेंगुर्ला-4 आणि वेंगुर्ला-7 या सुधारित व अधिक उत्पादनक्षम जातींची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सध्या तालुक्यात सुमारे 645 हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड असून, चालू हंगामात सुमारे 1500 मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
काजू झाडांची योग्य लागवड, छाटणी, खत व्यवस्थापन व रोगनियंत्रण केल्यास लागवडीनंतर तिसऱ्या अथवा चौथ्या वर्षापासून उत्पादनास सुरुवात होते. साधारणतः नोव्हेंबर महिन्यात काजूला मोहोर येतो. मोहोर आल्यानंतर फळ तयार होण्यासाठी 65 ते 70 दिवसांचा कालावधी लागतो. बहुतेक वेळा काजूला दोन ते तीन टप्प्यांत मोहोर येतो, यापैकी डिसेंबर व जानेवारी महिन्यांत येणाऱ्या दुसऱ्या मोहोऱ्यापासून सर्वाधिक उत्पादन मिळते. त्यामुळे या काळात मोहोराची विशेष निगा राखणे उत्पादनवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
लवकर आलेल्या मोहोऱ्यापासून तयार होणारी फळे साधारणतः 60 दिवसांत काढणीसाठी तयार होतात, तर उशिरा आलेल्या मोहोऱ्यापासून तयार होणारी फळे 45 दिवसांतच तयार होतात. श्रीवर्धन तालुक्यातील उत्तम निचऱ्याची जमीन, किंचित आम्लयुक्त माती तसेच डोंगर उतारावरील तांबडी माती ही काजू पिकासाठी विशेषतः अनुकूल आहे. वरकस जमिनीत काजूची झाडे जोमाने वाढतात आणि दर्जेदार उत्पादन देतात.
तालुक्यातील उष्ण व दमट हवामान काजू पिकासाठी पोषक असून, यंदा वेळेत आणि समाधानकारक प्रमाणात मोहोर आल्याने बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तयार काजू फळे मुंबई, पुणे येथील घाऊक व्यापाऱ्यांकडे तसेच स्थानिक बाजारपेठेत पाठवली जात असून, ओले काजूगर व सुके काजूगर यांना बाजारात चांगली मागणी आहे. परिणामी, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ घडवून आणणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
काजूच्या फळापासून जॅम, जेली, कँडीसह विविध चविष्ट व मसालेदार पदार्थ तयार करता येतात. काजू प्रक्रिया उद्योग हा कमी खर्चात अधिक नफा देणारा व्यवसाय मानला जातो. काजू आधारित स्नॅक्स, काजूचे पीठ व मूल्यवर्धित उत्पादने तयार करून स्थानिक तरुणांना स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध आहे. काजूच्या टरफलापासून काढले जाणारे तेल औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. या तेलाचा वापर शाई, रबर व विविध रासायनिक उद्योगांमध्ये होतो. श्रीवर्धन तालुक्यात काजूचे भरघोस उत्पादन होत असतानाही या व्यवसायाची पुरेशी संधी अद्याप न वापरली गेली आहे. योग्य मार्गदर्शन व गुंतवणुकीद्वारे काजू उद्योग तालुक्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देऊ शकतो.
काजू पिकाच्या लागवडीसाठी शासनाच्या फळबाग लागवड योजनेअंतर्गत आकर्षक अनुदान उपलब्ध आहे. तसेच काजू फळ प्रक्रिया व मूल्यवर्धनासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न दोन्ही वाढू शकते. काजू लागवडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दर्जेदार उत्पादन मिळते. प्रक्रिया उद्योग उभारल्यास स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे बागायतदार व तरुण उद्योजकांनी पुढाकार घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा.
श्रद्धा किरण डुंबरे, तालुका कृषी अधिकारी, श्रीवर्धन