

श्रीवर्धन शहर : अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील धोंडगल्ली परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास मोठा अनर्थ टळल्याची धक्कादायक घटना घडली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर डोंगराच्या उतारावरील माती वाहून गेल्याने सैल झालेला एक भला मोठा दगड थेट घरांच्या बाजूने खाली कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दगडाखाली सापडलेल्या एका दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला.
श्रीवर्धनमधील अनेक विभागांमध्ये डोंगरालगत वस्ती आहे. पावसाळ्यात माती वाहून जाणे, दगड सैल होणे आणि दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. धोंडगल्लीतील नागरिकांनी याबाबत अनेक वेळा प्रशासनाला लेखी व तोंडी सूचना दिल्या होत्या. डोंगराच्या पायथ्याशी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती. त्यासाठी स्थानिकांनी पाठपुरावाही केला; मात्र आपत्तीजनक परिस्थिती लक्षात घेऊन तातडीची उपाययोजना कर ण्याऐवजी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. दगड ज्या ठिकाणी कोसळला, त्या परिसरात घरे अगदी जवळ असल्याने काही क्षण उशीर झाला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, धोकादायक क्षेत्र म्हणून येथील घरांना स्थलांतर करण्याची पत्रे प्रशासनाकडून दिली जातात; परंतु त्याचवेळी त्या भागाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या संरक्षक भिंती, मातीधूप रोखण्याची कामे, पावसाळी आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना आणि डोंगर स्थिरीकरण याकडे मात्र गांभीर्याने पाहिले जात नाही.
"लोकांनी घरं सोडा असं सांगितलं जातं, पण सुरक्षिततेसाठी आवश्यक कामं मात्र केली जात नाहीत. प्रशासन नेमकं कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
भविष्यातील धोक्याची घंटा
घटनेनंतर संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक दगड हटवावेत, संरक्षक भिंत उभारावी, डोंगर स्थिरीकरणाची कायमस्वरूपी कामे हाती घ्यावीत आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित कृती आराखडा जाहीर करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. धोंडगल्लीतील आजची घटना ही केवळ इशारा नसून भविष्यातील संभाव्य मोठ्या आपत्तीची गंभीर घंटा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.