

उरण : उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, पिरकोण, सारडे, वशेणी, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीत तसेच चाणजे, नवघर, जासई जिल्हा परिषद मतदार संघातील गावांमध्ये रात्री, अपरात्री वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला असून महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिक अक्षरशः वेठीस धरले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यातच वीजबिल मात्र भरमसाठ येत असताना लोकप्रतिनिधी मात्र मुक गिळून गप्प बसले असल्याने उरणच्या नागरिकांना वाली कोण असा प्रश्न जनमानसात उपस्थित केला जात आहे.
बैठकीच्या काही दिवसांतच चिरनेर जिल्हा परिषद मतदार संघातील गावांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित राहिला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत वीज न आल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यात उच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे महावितरण अनेकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंना त्याचा फटका बसला, तसेच उरण शहर आणि चाणजे, नवघर जासई जिल्हा परिषद मतदार संघातील गावांमध्ये रात्री अपरात्री वारंवार विज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकंदरीत महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे लघुउद्योग, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.
मात्र असे असतानाही विज बिल मात्र भरमसाठ येत आहे. त्यातच येथील लोकप्रतिनिधी मुक गिळून गप्प बसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली जात आहे. तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निष्काळजीपणावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा संतप्त नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.
बैठकीतील निर्णयाकडे कानाडोळा
उरण तालुक्यातील वीज समस्या बद्दल पनवेल येथील बैठकीत लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न जोरदारपणे उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, बैठकीनंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.