

श्रीवर्धन शहर : चालक वाहकांच्या कमतरतेमुळे श्रीवर्धन आगाराचे वेळापत्रक कोलमडले असून, त्याचा प्रवाशांना त्रास होत आहे. यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
एस.टी.चे श्रीवर्धन आगार हे फार जुने तसेच मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे ५० कि. मी. आंत असलेले आगार आहे. एक काळ असा होता की, श्रीवर्धन आगाराचे उत्पन्न जिल्ह्यात सर्वाधिक असायचे. आता मात्र खूप स्थित्यंतरे झाली असून श्रीवर्धन आगाराची स्थिती काहीशी बिकट झालेली दिसते. महा मंडळाच्या नियमांनुसार तोट्यात चालणा-या गाड्या बंद कराव्या लागतात.
काही गाड्या स्थानकातन उशीरा सुटतात त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारी वाढत जातात. याच्या कारणांचा शोध घेतला असता असे समजले की, सध्या वाहक-चालक संख्येच्या कमतरतेमुळे गाड्या उशीरा सुटण्यासारख्या समस्या निर्माण आहेत. वाहक-चालकांच्या झालेल्या बदल्या, सेवानिवृत्ती इ. कारणांमुळे चालक वाहकांची संख्या सुमारे १० ते १५ ने कमी पडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाहक-चालकांच्या संख्येचा विचार करता श्रीवर्धन आगाराकडे सध्या ४० चालक, २२ वाहक व १०१ चालक-वाहक अशी एकूण १६३ संख्या आहे. चालक वाहकांच्या झालेल्या बदल्या, त्यांचे जागी नवीन कर्मचारी वेळेवर न येणे या सर्वाचा परिणाम गाड्या वेळेवर न सुटण्यावर होतो आणि त्यामुळे कामावर असलेल्या चालक-वाहकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे स्पष्ट होते.
कमी असलेली कर्मचारी संख्या जर आगाराच्या नियमिततेवर परिणाम करीत असेल तर प्रशासनाने बदल्या झालेल्या वा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या जागी त्वरेने माणसे उपलब्ध करुन दिल्यास श्रीवर्धन आगाराच्या ब-याचशा समस्या कमी होऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आगाराकडे ५६ गाड्या
आगाराकडे असलेल्या बसेसची संख्या पाहता श्रीवर्धन आगाराकडे सध्या २८ साध्या गाड्या (त्यातील १० सी.एन.जी. व २८ डिझेलच्या), शिवशाही गाड्या ६, स्लीपर कोच०८, व खासगी कंपनीच्या १४ अशा एकूण ५६ गाड्या आहेत. त्यात लालपरी या नवीन आलेल्याही ५ गाड्या आहेत.